शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरेंना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे नाव तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’, या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली आहे. तर, ठाकरेंना ‘धगधगती मशाल’ आणि शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ चिन्ह देण्यात आलं आहे. प्रकरणावरती जयदेव ठाकरेंचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी भाष्य केलं आहे.

“शिवसेना हे नाव पणजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी दिलं. ‘धनुष्यबाण’ चिन्ह आणि ‘शिवसेना’ नाव मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणार असून, त्यांची अस्मिता आहे. शिवसेनेच्या वाढीसाठी मोठा संघर्ष आणि मेहनत करण्यात आली. पक्षाच्या माध्यमातून अनेकांना नोकऱ्या मिळाल्या, एवढी घरे चालत आहे. मात्र, चिन्ह आणि नाव गोठवणे हा मराठी माणसाच्या अस्मितेवरचा घाला आहे,” असे जयदीप ठाकरेंनी म्हटलं.

हेही वाचा – पंतप्रधानांची नक्कल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “कायदा माझ्या बापाने…”

शिवसेनेला मिळालेल्या नवीन चिन्हावर बोलताना जयदीप ठाकरे म्हणाले, “मशाल हे क्रांतीचे प्रतिक असून, शिवसेना क्रांती घडवणार. बाळासाहेबांचे नाव जरी शिंदे गटाने घेतलं असलं, तरी रक्त आमच्याकडे आहे. लवकरच उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. ते देतील ती जबाबदारी स्वीकारेल,” असेही जयदीप ठाकरेंनी स्पष्ट केलं. ते टीव्ही ९ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयदीप ठाकरेंची शिवसेनेच्या दसरा मेळव्याला उपस्थिती

दरम्यान, उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. तसेच, जयदेव ठाकरेंच्या घटस्फोटित पत्नी स्मिता ठाकरे, बिंदू माधव ठाकरेंचे सुपुत्र निहार ठाकरेंनीही एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होती. यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतलेली भेट असो, किंवा दसरा मेळाव्याला तीन ठाकरेंची हजेरी असो, एकप्रकारे शिंदेंनी ‘ठाकरे’ कुटुंबातील सदस्य कसे आपल्या बाजूने आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. मात्र जयदेव आणि त्यांची पहिली पत्नी जयश्री यांचे सुपुत्र, म्हणजेच बाळासाहेबांचे सर्वात मोठे नातू जयदीप ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर झालेल्या उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. आपण ठाकरेंसोबत असल्याचं जयदीप यांनी सांगितलं आहे.