करोनाच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाने जाहीर केलेल्या सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) येथील बाजार समितीत उल्लंघन होत असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा दिसून आले. सकाळी बाजार समितीत विक्रेत्यांनी कोणत्याही नियमांचे पालन न करता मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती.

भाजीपाला जीवनावश्यक असल्याने खरेदी-विक्री करण्यास कोणतेही निर्बंध नाहीत. परंतु, गर्दी करू नये तसेच सामाजिक अंतराचे पालन करण्याची सुचना करण्यात आली आहे. असे असतांनाही विक्रेत्यांकडून या सुचनांचे पालन केले जात नाही. बुधवारी विक्रेत्यांनी पुन्हा गर्दी केल्याने प्रशासनाला कठोर उपाययोजना कराव्या लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दृकश्राव्य माध्यमाव्दारे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या चर्चेत पाटील हे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहातून सहभागी झाले होते. बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. जळगावच्या प्रयोगशाळेसाठी त्वरीत प्रस्ताव पाठवावा तसेच त्यासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून ५० लाख रूपये देता येतील, असे बैठकीत आपणास सांगण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले. जळगाव जिल्ह्यातील एका करोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला असून एकावर उपचार सुरू आहेत. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जळगाव जिल्ह्यास लागून असलेल्या मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यांची सीमा बंद करण्याची मागणी पाटील यांनी बैठकीत केली. असे केल्यामुळे शेजारील राज्यातून कोणी जळगावमध्ये येऊ शकणार नाही, असे पाटील यांनी सुचविले. वाहतूक बंद असल्याने केळी उत्पादकांना दिलासा देण्यासाठी जैन इरिगेशनने शेतकऱ्यांकडून केळी घ्यावीत, यासाठी आपण त्यांना विनंती करणार असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.

करोनाविषयी जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांचा आढावा जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी सहायक पोलीस अधिक्षक डॉ. नीलभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सुशील कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे आदी उपस्थित होते.

प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. जे कोणी जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याविरूध्द कारवाई करण्यात येईल. नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर उपस्थित न झाल्यास त्यांच्याविरूध्द कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

करोनाविरूध्दच्या लढाईत नागरिकांमध्ये जाऊन सव्‍‌र्हेक्षण करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी यांना मास्क, सॅनिटायजर आरोग्य विभागाने त्वरीत उपलब्ध करून द्यावेत, त्यासाठी महिला बचत गटांनी तयार केलेले मास्क खरेदी करावेत, निवारागृहातील नागरिकांना आवश्यक सुविधा वेळेवर उपलब्ध होतात किंवा नाही याची तपासणी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी, जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तुंचा वाहनांव्दारे पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी परिवहन विभागाने दक्षता घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचाऱ्यांना नोटीस

करोना नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक, आपत्कालीन उपाययोजना करण्यासंदर्भात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील २५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.