जालना : चालू खरीप हंगामात कापूस पिकाचे क्षेत्र घटल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. मागील हंगामात जिल्ह्यात कापूस क्षेत्र दोन लाख ९१ हजार ६७६ हेक्टर होते. चालू खरीप हंगामात हे क्षेत्र १२ हजार ६२० हेक्टरने कमी झाले आहे.

चालू हंगामात कापसाचे सरासरी अपेक्षित क्षेत्र ३ लाख २२ हजार ३२६ हेक्टर असून, प्रत्यक्षात त्यांपैकी २ लाख ७९ हजार ५६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत हे क्षेत्र ८६ टक्के आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत चालू हंगामात अपेक्षित सरासरीच्या तुलनेत कमी झालेले कापसाचे क्षेत्र जवळपास ४३ हजार हेक्टर आहे. जिल्ह्यात या वर्षीच्या खरिपात ६ लाख २४ हजार हेक्टरवर तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य, कापूस आणि ऊस मिळून एकूण पिकांची अपेक्षित सरासरीच्या ९६ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी जवळपास ८० टक्के क्षेत्र कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांचे आहे.

जालना हा प्रामुख्याने कापूस पीक घेणारा जिल्हा आहे. एकूण खरीप पिकांपैकी ४५ ते ५० टक्के क्षेत्र या पिकाचे नेहमीच राहत आले आहे. मागील २० वर्षांत जिल्ह्यात कापसाचे सर्वाधिक क्षेत्र २०११ मध्ये (३ लाख २२ हजार हेक्टर) होते. कमी पावसाच्या २०१२मधील हंगामाचा अपवादवगळता नेहमीच कापसाचे जिल्ह्यातील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर राहिलेले आहे.

निवृत्त कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी ‘लोकसत्ता’स सांगितले, की राज्यातील कापसाचे सरासरी अपेक्षित लागवड क्षेत्र ४२ लाख ४७ हजार हेक्टर असले, तरी या वर्षी ३८ लाख १७ हजार हेक्टर क्षेत्र या पिकाखाली आले आहे. अपेक्षित सरासरीच्या तुलनेत जवळपास ४ लाख ३० हेक्टर क्षेत्र राज्यांत कमी लागवडीखाली आल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून दिसते. मागील वर्षाच्या (२०२४) तुलनेत राज्यातील कापसाचे क्षेत्र अडीच लाख हेक्टरने कमी आहे. राज्यातील २१ जिल्हे कापसाचे आहेत. त्यांपैकी पाच मराठवाड्यातील आहेत. कृषी विभागाच्या अहवालानुसार या वर्षी या पाचही जिल्ह्यांत मागील वर्षाच्या तुलनेत कापसाची कमी लागवड झालेली आहे.

दोन वर्षांपूर्वी बाजारातील कापसाचा भाव नऊ-साडेनऊ हजारापर्यंत होता. गेल्या वर्षी हाच भाव साडेसहा-सात हजारापर्यंत आला होता. कापूस वेचणीसाठी लागणारा खर्च, खते आणि कीटकनाशकांची भाववाढ हे कापसाच्या शेतीसमोरील प्रश्न आहेत. उत्पादन खर्चातील वाढ आणि प्रत्यक्षात कमी भाव याचा अनुभव गेल्या वर्षी पाहायला मिळाला. या वर्षी उत्पादन खर्चात आणखी वाढ झालेली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.