जालना – जिल्ह्यातील पांडेपोखरी (तालुका परतूर) गावातील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पश्चिम बंगालमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून समीरन निर्मल सरकार (राहणार आकाईयूर गोपालनगर जिल्हा उत्तरपरगणा, पश्चिम बंगाल) यास २० वर्षे सक्तमजुरी आणि एकूण ४४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड भरला नाही तर आणखी दोन वर्षे साधा कारावास भोगावा असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहीते यांनी निकालात म्हटले आहे.
पांडेपोखरी गावात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या आरोपीने गावातील अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून २८ सप्टेंबर २०२४ रोजी तिला रेल्वेने मुरादाबाद जिल्ह्यात नेले. गावात आणि नातेवाईकांकडे मुलीचा शोध लागला नाही. म्हणून तिच्या आईने याप्रकरणी ३० सप्टेंबर २०२४ रोजी आष्टी पोलिसांत दिली होती. आरोपी आणि मुलीच्या ठिकाणाची माहिती उपलब्ध झाल्यावर ९ डिसेंबर २०२४ रोजी जालना पोलिसांनी मैनखेर येथे जाऊन तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. आरोपीने नागली या खेडेगावात दवाखाना सुरु केला होता. आरोपी आणि पीडित मुलीस पोलिसांनी ताब्यात घेऊन याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
याप्रकरणात फिर्यादीच्यावतीने विशेष जिल्हा सरकारी वकील वर्षा मुकीम यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. या खटल्यात आरोपीस वेगवेगळ्या गुन्हयांखाली २० वर्ष, पाच वर्ष आणि एक वर्ष सक्तमजुरी आणि एकूण ४४ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.