इंग्लंड, अमेरिका, जपान आदी देशांमध्ये उपळा आणि पाडोळी या नावाने जरबेराचे फुल आढळून आल्यास आता नवल वाटू नये. कारण उस्मानाबाद तालुक्यातील उपळा आणि पाडोळी या नावाने पोर्तुगालमध्ये जरबेरा फुलाचे वाण विकसीत होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील जरबेराची शेती जागतिक बाजारपेठेत नवीन ओळख निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, असे मत या वाणाची निर्मिती करणारे पोर्तुगाल येथील जरबेराचे संशोधक डेव्हीड यारकोनी यांनी व्यक्त केले.
जरबेरा शेती व तंत्रज्ञान या विषयावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले हौोते. उस्मानाबाद जिल्ह्यातील जरबेरा फुलांची शेती पाहण्यासाठी यारकोनी आले होते. या वेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून या जिल्ह्यात जरबेरा फुलांचे उत्पादन होत असल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. जिल्ह्यात २००५ मध्ये माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काही तरुणांनी फुलशेतीला सुरुवात केली. दहा वर्षांपूर्वी शहरात पॉली हाऊस उभारून जरबेराची शेती सुरू झाली. मिळालेले उत्पन्न, त्यातून होणारा आर्थिक लाभ लक्षात आल्यानंतर मागील १० वर्षांत जरबेराची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. आता तब्बल २०० पॉली हाऊसमधून जरबेराचे ताटवे मोठय़ा शहरांचे लक्ष वेधून घेत आहेत. पोर्तुगाल येथे विकसीत झालेल्या वेगवेगळ्या वाणांची फुले दिमाखात डोलत आहेत. उस्मानाबाद तालुक्यातील उपळा आणि पाडोळी या दोन गावांनी तर जरबेरा शेतीचे गाव म्हणून आपली स्वतंत्र ओळख राज्यासह बाहेरील अनेक शहरांपर्यंत पोहोचवली आहे.
प्रगत देशांमध्ये एका चौरस मीटरमध्ये १०० ते ११० फुलांचे उत्पादन होते. उस्मानाबादमध्ये मात्र एक चौरस मीटर क्षेत्रावर तब्बल २३० फुले आढळून आली. एवढे विक्रमी उत्पादन इतर कोठेही पाहिले नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. उत्पादन खूप मोठय़ा संख्येने होत आहे. त्यात गुणवत्ता राखल्यास पुढील काळात उस्मानाबादच्या फुलांना जगभरातून मोठी मागणी येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दर ३ वर्षांनी वेगवेगळे वाण विकसीत करण्याचे काम पोर्तुगालमध्ये केले जाते. भारत व पोर्तुगालमधील वातावरण जवळपास सारखे आहे. उपळा आणि पाडोळी या गावांमधून जरबेराच्या शेतीसाठी सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यामुळे या दोन गावांच्या नावाने आपण नवीन वाण विकसीत केले असल्याचे यारकोनी यांनी सांगितले.
सध्या या वाणावर संशोधन सुरू आहे. हे विकसीत झालेले वाण पुढील दोन वर्षांत जगाच्या कानाकोपऱ्यात उपळा आणि पाडोळी या दोन नावांनी वितरित केले जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात जगाच्या बाजारपेठेत उस्मानाबादच्या जरबेराची छाप पडल्याखेरीज राहणार नाही, असा ठाम विश्वास यारकोनी यांनी या वेळी व्यक्त केला. उस्मानाबादी शेळीपाठोपाठ आता जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्यांनी मोठय़ा कष्टाने निर्माण केलेली जरबेरा शेतीची ओळख उपळा आणि पाडोळी या वाणांच्या माध्यमातून देशाची मान उंचावणार आहे.
अन्य पिकांनाही नवसंजीवनी शक्य
फुलशेतीबरोबर अन्य पिकांनाही पॉली हाऊसच्या माध्यमातून संजीवनी मिळेल, असे काम शेतकऱ्यांनी करायला हवे असे मत माजी मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केले. कृषी विभाग, महालक्ष्मी ग्रीन हाऊस, अर्केडिया अॅग्रो, फिनोलेक्स प्लासॉन ठिबक यांच्या वतीने जरबेरा फुलशेतीचे तंत्रज्ञान या विषयावर शहरातील शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या सभागृहात एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. शिवसेना जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आनंद चौगुले, प्रशांत कोंडे, उज्ज्वल पाटील, अविनाश मोरे आदींची या वेळी उपस्थिती होती. जिल्हाभरातून शेतकरी या वेळी मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. जरबेरा फुलशेती तंत्रज्ञान, पॉलिहाऊस आणि शेड-नेटसाठी असलेल्या विविध शासकीय योजना, पाणी व्यवस्थापन, विपणन आदी विषयांवर तज्ज्ञ मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. रवींद्र केसकर यांनी सूत्रसंचालन, अविनाश मोरे यांनी प्रास्ताविक, बालाजी पवार यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onशेतीFarming
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jarbera flower farming
First published on: 28-04-2015 at 01:54 IST