दिगंबर शिंदे

सांगली : दोन लाख लग्नपत्रिका, मतदारसंघासह वाळवा तालुक्यात घरटी पोहोचलेले आग्रहाचे आवतन, हजारो चौरस फुटांचा शामियाना, चकाचक बनलेले रस्ते, एकाच वेळी हजारो लोकांची उदरभरणाची व्यवस्था आणि मातब्बरांच्या स्वागताची जय्यत तयारी. एका शाही विवाहासाठी इस्लामपूरनगरी सज्ज झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या जेष्ठ चिरंजीवांचा शाही विवाह सोहळा रविवारी आयोजित करण्यात आला असून त्याची लगबग जिल्ह्यात सध्या सुरू आहे.

कासेगावच्या पाटलांच्या वाडय़ावर गेला महिनाभर लघीनघाई सुरू असून स्व. राजारामबापू पाटील यांचे नातू प्रतीक यांचा विवाह रविवारी (दि. २७) रोजी सायंकाळी ५.३५ या मुहूर्तावर राजारामनगर येथे होत आहे. यासाठी उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची कन्या अलिका ही वधू नेमस्त केली आहे. या विवाहाची चर्चा राजकीय व सामाजिक पातळीवर गेला महिनाभर सुरू आहे. तुलसी विवाहापासून तर मंडप उभारणी, केळवणासह अन्य विधी संगीत रजनीच्या साथीने सुरू आहेत. दस्तुरखुद्द आ. पाटील यांनीही एका संगीत कार्यक्रमात सहभागी होत ‘खामोश, यहाँ के असली खिलाडी हम है,’ असे सांगत असल्याची दृश्यफीत समाजमाध्यमावरही प्रसारित झाल्याने या विवाहाची उत्सुकता सर्वानाच लागली आहे.

 विवाहासाठी राजारामनगरमध्ये भव्य शामियाना उभारण्यात आला असून वधूवरांसह यजमान शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ज्या स्थळी उभे राहणार आहेत, त्या व्यासपीठाची एक मंदिर, घंटा या रूपात सजावट करण्यात आली आहे. या व्यासपीठासमोर विशेष मान्यवरांची बैठक व्यवस्था असून महिलांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. बियाणे मळा परिसरात भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून एका वेळी पाच हजारांना याचा लाभ घेता येईल अशी सोय करण्यात आली आहे.

अनेकांची उपस्थिती :

या शाही विवाहाच्या मातब्बर मान्यवरांसाठी एक, नातलगांसाठी स्वतंत्र आणि मतदारसंघातील घरटी व सामान्यांना देण्यासाठी एक अशा तीन पद्धतीच्या सुमारे दोन लाख लग्नपत्रिका वाटण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार, साखर कारखान्याचे अध्यक्ष, विविध पक्षांचे राज्यपातळीवरील नेते अशा मातब्बरांची पायधूळ यानिमित्ताने इस्लामपूरनगरीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विविध सुविधा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 ‘याची देही, याची डोळा’ हा शाही विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मंडपामध्ये आठ ठिकाणी ‘क्लोज सर्किट’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यापूर्वी जमलेल्या वऱ्हाडी मंडळीसाठी खास मेजवानीची व्यवस्था करण्यात आली आहे. एका वेळी पाच हजार लोकांना पंगतीचा लाभ घेता यावा अशी व्यवस्था करण्यात आली असून श्रीखंड पुरी, मसाले भातासह अनेक पदार्थाचा बेत ठरला आहे.