महापौरपदावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री अहिरराव तर उपमहापौरपदी डॉ. फारुख शहा यांची मंगळवारी बहुमताने निवड झाली. निवडणुकीत राष्ट्रवादीविरोधात टीकास्त्र सोडणाऱ्या काँग्रेस, लोकसंग्राम आणि समाजवादी पार्टीने या मतदानावेळी याच पक्षाला मतदान करत सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. सेना-भाजप युतीच्या जोत्स्ना पाटील व वैभवी दुसाणे यांना पराभूत व्हावे लागले.
हात उंचावून झालेल्या मतदानात महापौरपदी अहिरराव यांना ५४ तर युतीच्या उमेदवार पाटील यांना केवळ १४ मते मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत डॉ. शहा यांनी ५५ तर विरोधी दुसाणे यांना १४ मते मिळाली. सभागृहात उशिरा आल्याने नगरसेवक गोविंद साखला यांना महापौर निवडीवेळी मतदान करता आले नाही. त्यांनी उपमहापौर निवडीवेळी मतदान केले. बसपाच्या नगरसेविका सुशिलाबाई ईशी या गैरहजर राहिल्या. पीठासीन अधिकाऱ्यांनी महापौरपदी अहिरराव आणि उपमहापौरपदी डॉ. शहा यांच्या नावाची घोषणा केली. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमत मिळविले होते. महापालिकेत अधिकृत ३४ व दोन पुरस्कृत असे राष्ट्रवादीचे ३६ सदस्य आहेत. त्यांना अपक्ष ८, समाजवादी पार्टी तीन, काँग्रेसचे सात तर लोकसंग्राम पक्षाचा एक यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रवादीने एकहाती सत्ता प्राप्त केली.