कोकण किनारपट्टीवर जेली फिशचे मोठय़ा प्रमाणात आक्रमण झाले आहे. या आक्रमणामुळे सुरमई, पापलेटसारखे मासे मिळेनासे झाले आहे. ऐन हंगामात हे मासे मिळेनासे झाल्याने कोकण किनारपट्टीवरील मासेमारी मात्र अडचणीत आली आहे.
साधारणपणे दोन ते तीन वर्षांतून एकदा कोकणकिनारपट्टीवर जेली फिश दाखल होत असतात. मात्र या जेली फिशचे आगमन मच्छीमारांसाठी डोकेदुखीचे ठरत असते. कारण जेली फिशच्या आक्रमणानंतर समुद्रातील इतर मत्सप्रजाती खोल समुद्रात निघून जात असतात. सध्या रायगड जिल्ह्य़ातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या किनाऱ्यांवर जेली फिशचा मुक्त संचार सुरू असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली आहे. एकदा जेली फिश म्हणजेच जोगीमका या माशांचा संचार सुरू झाला की इतर मासे तिथे थांबत नाहीत. त्यामुळे किनारपट्टीवर या काळात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या मत्स प्रजाती मिळेनाशा होतात. याचाच अनुभव सध्या जिल्ह्य़ातील मच्छीमारांना येतो आहे. माकूळ मासा सोडला तर सुरमई आणि पापलेटसारखे मासे मिळेनासे झाले आहेत.
त्यामुळे ऐन हंगामात कोकणातील मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. मात्र माकूळ अर्थात कॅटल फिशला बाजारात सध्या चांगली मागणी आणि किंमत असल्याने मच्छीमारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जोपर्यंत कोकण किनारपट्टीवर जेलीफिशचे वास्तव्य असेल तोपर्यंत माशांच्या इतर प्रजाती फारशा मिळणार नाही असे मत काही जाणकार मच्छीमारांनी व्यक्त केले आहे.
कोकण किनारपट्टीवर दाखल झालेल्या या जेली फिशचा फटका कोकणातील पर्यटनावरही होण्याची शक्यता आहे. कारण जेली फिशच्या स्पर्शाने अंगाला खाज सुटणे आणि फोड उठणे यांसारखे प्रकार होत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले आहे.