राजमाता जिजाऊंचा पाचाड येथील राजवाडा अखेरची घटका मोजत आहे. पुरातत्त्व विभागाच्या उदासिनतेमुळे हा ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या राजवाडय़ाची तात्काळ दुरुस्ती केली जावी अशी मागणी शिवप्रेमींकडून केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात हिंदवी स्वराज्याची चेतना जागवणाऱ्या जिजाऊंचे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे वास्तव्य होते. जिजाऊंच्या समाधिस्थळापासून अवघ्या ५ मिनिटांच्या अंतरावर त्यांच्यासाठी सुसज्ज राजवाडय़ाची उभारणी करण्यात आली होती. याच राजवाडय़ात जिजाऊंचे अनेक वर्षे वास्तव्य होते. आपल्या जीवनाचा अखेरचा श्वासही त्यांनी याच वाडय़ात घेतला. महाराजांचे सन्यदलही या परिसरात वास्तव्यास होते. आज मात्र या ऐतिहासिक वाडय़ाची दुरवस्था झाली आहे. काळाच्या ओघात राजवाडय़ाचा बराचसा भाग नामशेष झाला आहे. राजवाडा परिसरात गवताचे साम्राज्य पसरले आहे, तर या भागात गुरांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राजवाडा परिसराला अवकळा आली आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजवाडय़ालगतच्या १४ एकरला परिसराला पुरातत्त्व खात्याने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल आहे. तसे फलकही येथे लावण्यात आले आहेत. मात्र राजवाडय़ाची देखभाल करण्याकडे पुरातत्त्व विभागाने लक्ष दिलेले नाही. देखभाल दुरुस्तीअभावी वाडय़ाची तटबंदीही अखेरची घटका मोजते आहे. इमारतीच्या पायाचे दगडही निखळू लागले आहेत. मात्र पुरातत्त्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी फिरकतानाही दिसत नाही. किल्ले रायगड आणि जिजाऊंची समाधी पाहायला येणाऱ्या पर्यटक आणि शिवभक्तांची पावले इकडे वळतात खरी, पण येथील परिस्थिती पाहून हताश होतात. पुरातत्त्व विभागाने हा परिसर अडगळीत टाकल्याची भावना शिवभक्त व्यक्त करताहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकासाठी शासन कोटय़वधी रुपये खर्च करणार आहे. मात्र दुसरीकडे जिजाऊ राजवाडय़ासारखी ऐतिहासिक स्मारके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या स्मारकाची वेळीच देखभाल केली नाही तर इतिहासाच्या या पाऊलखुणा नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्थानिक ग्रामस्थ या परिसराची देखभाल करायला तयार आहेत, परंतु त्याला पुरातत्त्व विभाग मान्यता देत नाही. रायगड जिल्हा परिषदेने पण यासाठी निधी देण्याची तयारी दाखवली होती, मात्र पुरातत्त्व विभाग त्यालाही तयार नाही. पुरातत्त्व खात्याच्या या अनास्थेबद्दल ग्रामस्थ नाराजी व्यक्त करतात. शासनाने यात लक्ष घालून हा इतिहासाचा वारसा जतन करावा अशी मागणी शिवभक्त रघुवीर देशमुख यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jijabai palace at last stage
First published on: 15-01-2015 at 03:57 IST