दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखान्याच्या कामगांराचे थकित व हक्काचे दोन कोटी रुपये देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी दिले होते. मात्र, त्यांनी ते पाळले नसल्याने कामगारांचे हाल होत असल्याचा आरोप संघर्ष समितीचे राजन चौधरी यांनी केला आहे.
रक्कम मिळण्यासाठी कामगारांनी ३० जानेवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. विविध प्रकारची आंदोलने करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतलेली नाही. तब्बल पंधरा दिवसांपासून कामगारांनी जिल्हा कचेरीच्या परिसरात कडाक्याच्या थंडीत उघडय़ावरच ठिय्या मांडला आहे. त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालेला असतांना जिल्हाधिकारी कामगारांशी प्रतारणा करीत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी जोपर्यंत रक्कम अदा करत नाहीत तोपर्यंत बुलढाणा सोडणार नसल्याचा निर्धार वयोवृध्द कामगारांनी केला आहे. शेकडो कामगार उपाशीतापाशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करीत आहेत. धरणे, निदर्शने करूनही प्रशासन दखल घेत नाही, तसेच जिल्हाधिकारी दखल घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवून आपला रोष व्यक्त केला होता. या प्रकारामुळे कामगारांविरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. अखेर पोलिसांनी त्यांना स्थानबध्द केले. कितीही गुन्हे दाखल होवोत, आता हक्काचे दोन कोटी रुपये घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा राजन चौधरी यांच्यासह कामगारांनी दिला आहे. कामगारांचे पैसे देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. रक्कम अदा केली जाईल, असे प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकारी कुरूंदकर यांनी न्यायालयाला दिले होते. मात्र, त्यानंतरही रक्कम न दिल्याने जिल्हाधिकारी न्यायालयाचा अवमान करीत असल्याचे कामगारांनी सांगितले. गुरुवारी रात्री कामगारांनी जुन्या अध्यापक वसतीगृहाच्या आवारात थंडीत कुडकुडत रात्र काढली. कामगारांचा आंदोलनाचा निर्धार कायम आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी आहे.