Jitendra Awhad : महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या जंगली रमीचा वाद चांगलाच शिगेला पोहचला आहे. रोहित पवार यांनी सुरुवातीला जंगली रमी खेळणाऱ्या माणिकरावांचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यावरुन बराच वाद निर्माण झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं स्पष्टीकरण आलं. मी जाहिरात स्कीप करत होतो. जंगली रमी खेळत नव्हतो असं त्यांनी सांगितलं. आता जितेंद्र आव्हाड यांनी आणखी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत आणि किती हवे तेवढे पुरावे देऊ म्हटलं आहे.
माणिकराव कोकाटेंनी काय म्हटलं होतं?
माणिकराव कोकाटे म्हणाले, “मी विधानपरिषदेत कामकाजासाठी बसलो होतो. तेव्हा सभागृह काही वेळासाठी तहकूब झाले असावे. म्हणून मी खालच्या सभागृहात (विधानसभेत) काय कामकाज सुरू आहे, हे पाहण्यासाठी मोाबाइलवरून युट्यूबवर गेलो होतो. युट्यूबवर व्हिडीओ सुरू केल्यानंतर जाहिराती येत असतात. त्याप्रमाणेच त्यावेळी सदर जाहिरात आपोआप प्ले झाली. मी जाहिरात स्किप करून पुढे गेलो. पण व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांनी फक्त १८ सेकंदाचाच व्हिडीओ दाखवला.” असं स्पष्टीकरण दिलं होतं. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी आणखी दोन व्हिडीओ पोस्ट करत किती हवे तेवढे पुरावे देतो म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं आहे?
एकीकडे विधिमंडळाचे कामकाज सुरू आहे; प्रश्नौत्तरांचा तास सुरू आहे अन् दुसरीकडे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे जंगली रमी खेळत होते. त्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर, माणिकराव कोकाटे यांच्या पहिल्या व्हिडिओत ते जंगली रमी खेळतच नव्हते जाहिरात बघत होते असे सांगण्यात येत होते. आता मी दोन व्हिडिओ देतोय. दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा… कुठला पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे, हे दिसेल. माणिकराव कोकाटे हेच ऑनलाईन जुगाराचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत. आणखी किती पुरावे हवेत ते सांगा; मागाल तेवढे पुरावे देतो. महाराष्ट्राचाच जुगाराचा डाव करून टाकलाय…!
सुनील तटकरेंनी नेमकं माणिकराव कोकाटेंबाबत काय म्हटलंय?
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार घेतील. असंही सुनील तटकरे म्हणाले.माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं आहे. त्यांच्याकडून काही चुकीची विधानं गेली आहेत. त्यानंतर त्यांना समज देण्यात आली आहे. पण काल जो प्रकार समोर आला त्यानंतर काय करायचं याचा निर्णय अजित पवार घेतील असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.