गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे चर्चेत राहिले आहेत. आधी ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ठाण्यातला शो बंद पाडून तिथे झालेल्या गोंधळामुळे तर नंतर भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीमुळे. त्यामुळे दोन दिवसांच्या कालावधीत जितेंद्र आव्हाडांना दोन वेळा न्यायालयाकडून जामीन मिळवावा लागला. या पार्श्वभूमीवर आता विरोधकांकडून जितेंद्र आव्हाडांच्या अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा दाखला देत आव्हाडांवर टीकास्र सोडलं जात आहे. त्यामुळे आव्हाडांनी यावर खुलासा करणारं एक ट्वीट केलं असून त्यामध्ये अनंत करमुसे नावाच्या सोशल प्रोफाईलचे काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

‘हर हर महादेव’चा शो बंद पाडल्यानंतर तिथे झालेल्या गोंधळात एका प्रेक्षकाला आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी आव्हाडांना अटकही झाली. एक रात्र पोलीस स्टेशनमध्ये घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर २४ तासांच्या आत आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. एका कार्यक्रमातून परतत असताना गर्दीत आव्हाडांच्या समोर आलेल्या भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याला आव्हाडांनी हाताने बाजूला केलं. यावेळी आव्हाडांनी आपला विनयभंग केल्याची तक्रार या महिला पदाधिकाऱ्याने दाखल केली. त्याविरोधात अटकपूर्व जामीनासाठी आव्हाडांनी न्यायालयाद दाद मागितली. आव्हाडांना तो जामीन मंजूरही करण्यात आला.

“…तर तुम्ही काय केलं असतं?”

या सगळ्या गोंधळानंतर आता जितेंद्र आव्हाडांवर अनंत करमुसे प्रकरणावरून टीका करणाऱ्यांना त्यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्या माणसाने २०१६ ते २०२० या काळात माझा पाठलाग केला, ट्विटर-फेसबुकचा वापर करत बदनामी केली, ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला. टीका करणाऱ्यांनो, तुमच्या भावाचं, वडिलांचं किंवा तुमचं अशा प्रकारे नग्न छायाचित्र काढलं गेलं असतं किंवा इतकी वर्षं त्रास दिला गेला असता, तर आपण काय केलं असतं?” असा सवाल आव्हाडांनी ट्वीटच्या माध्यमातून विचारला आहे.

विश्लेषण: चित्रा वाघ आणि वाद हे समीकरण नेमके काय आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“चित्राताई, आपल्या नवऱ्याचं…”

“चित्राताई, आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या नेत्यांचं अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारित झालं असतं, तर आपण काय केलं असतं? याचं उत्तर कधीतरी द्या. २०१६ ते २०२० या काळात त्याने काय केलं, हे जरा कधीतरी बोलावून विचारा आणि मग टीका करा”, अशा शब्दांत आव्हाडांनी भाजपाच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनाही प्रत्युत्तर दिलं आहे.