भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराच्या चलनी नोटा चलनातून बाद करण्याचे ठरवलं आहे. त्यासाठी जनतेला मुदत देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांनी त्यांच्याकडील दोन हजाराच्या नोटा बँकेतून बदलून घेण्याचे आवाहन केले आहे. या नोटबंदीमुळे विरोधकांनी केंद्र सरकरावर टीकास्त्र केलं आहे. आता जितेंद्र आव्हाडांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे.
“टॅक्स आणि चलनी नोटांचे प्रयोग यथेच्छ झाले आहेत साहेबांनी दिल्लीतली राजधानी दौलताबादला हलवून टाकावी म्हणजे इतिहासाची कम्प्लिट पुनरावृत्ती होऊन जाईल”, असं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे.
दोन हजारांच्या नोटा बंद
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काल, १९ मे रोजी यासंदर्भातील मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे २ हजारच्या नोटा आहेत, त्यांनी तत्काळ बँकेत जाऊन बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नागरिक २ हजारच्या नोटा बँकेतून बदलून घेऊ शकतात.
आरबीआयने सांगितले की, २००० रुपयांची नोट कोणत्याही बँकेत बदलता येते. म्हणजेच जर तुमचे खाते स्टेट ऑफ इंडिया (SBI) मध्ये असेल आणि तुमच्या घराजवळ पंजाब नॅशनल बँक (PNB) असेल, तर तुम्ही PNB मध्ये जाऊन २००० रुपयांची नोट बदलून घेऊ शकता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही विशिष्ट बँकेत जाण्याची गरज नाही. कोणत्याही बँकेला भेट देऊन या बदलून घेतल्या जाऊ शकतात.