घराघरात पोहोचलेल्या ज्येष्ठ लेखिका ज्योत्स्ना देवधर यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९२६ रोजी राजस्थानातील जोधपूर येथे झाला. पुणे विद्यापीठातून हिंदी विषयामध्ये एम. ए. केल्यानंतर त्यांनी वर्धा येथून ‘साहित्य विशारद’ ही पदवी संपादन केली. त्या १९६० मध्ये आकाशवाणी पुणे केंद्रावर निर्मात्या म्हणून रुजू झाल्या.
 ‘गृहिणी’ या कार्यक्रमाचा भाग असलेल्या ‘माजघरातील गप्पा’ याद्वारे त्या घराघरामध्ये पोहोचल्या. ‘अंतरा’ या हिंदी कथासंग्रहाच्या लेखनाने त्यांनी साहित्य प्रांतामध्ये लेखनाची सुरुवात केली. तर, ‘घर गंगेच्या काठी’ या पहिल्याच मराठी कादंबरीने त्यांना अफाट लोकप्रियता लाभली. या कादंबरीला महाराष्ट्र सरकारचा ‘हरिभाऊ आपटे पुरस्कार’ मिळाला. ‘कॅक्टस’ हा हिंदूी कथासंग्रह, ‘कल्याणी’ हे हिंदूी नाटक, ‘निर्णय’ हे पुरुषपात्रविरहित नाटक, ‘रमाबाई’ ही कादंबरी या त्यांच्या साहित्यकृती पुरस्कारप्राप्त ठरल्या.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुणे मराठी ग्रंथालयाने ‘ज्येष्ठ लेखिका सन्मान’, अखिल भारतीय भाषा साहित्य संमेलनतर्फे ‘भाषाभूषण’ ही पदवी, महाराष्ट्र राज्य हिंदूी साहित्य अकादमीतर्फे ‘कल्याणी’ या नाटकास ‘विष्णुदास भावे पुरस्कार’    प्रदान करून ज्योत्स्ना देवधर यांचा गौरव केला.
कराड येथे १९७५ मध्ये झालेल्या पश्चिम महाराष्ट्र कथालेखिका संमेलनाचे अध्यक्षपद आणि अंबाजोगाई येथील जिल्हा महिला परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
 त्यांच्या ‘घर गंगेच्या काठी’, ‘कल्याणी’ आणि ‘पडझड’ या कादंबऱ्या पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा आणि इस्लामिया या विद्यापीठांच्या अभ्यासक्रमामध्ये होत्या. महाराष्ट्र राज्य नाटय़ परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार निवड समितीवर सभासद म्हणून त्यांनी काम केले होते.  त्यांच्या विविध कथांचे कन्नड, तेलगू, तमीळ, मल्याळम, आसामी, हिंदूी आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत.  ‘घर गंगेच्या काठी’ या चित्रपटाच्या कथा-पटकथा आणि संवादलेखनाबरोबरच त्यांनी ‘कल्याणी’ आणि ‘पडझड’ या दूरचित्रवाणी मालिकांसाठी लेखन केले आहे.

ज्योत्स्ना देवधर यांची साहित्यसंपदा
कथासंग्रह : अंतरा (हिंदी), गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गजगे, बोच, उद्ध्वस्त, आकाशी, मिसफीट, सात घरांच्या सीमारेषा, झरोका, सायली, निवडक ज्योत्स्ना देवधर, कॅक्टस (हिंदी), फिलर, धुम्मस, मधली िभत, दीर्घा, समास, विंझणवारा, पैलतीर, काळजी, याचि जन्मी कादंबरी : घर गंगेच्या काठी, कल्याणी, कडेलोट, चुकामूक, योगी अरिवद, उत्तरयोगी, वाळूचे फूल, चिमणीचं घर मेणाचं, एैलतीर, पैलतीर, एक अध्याय, पुतळा, पडझड, बुटक्या सावल्या, एक श्वास आणखी, रमाबाई, उणे एक, आक्रीत, अट ललित लेखन : मावळती, चेहरा आणि चेहरे, आठवणींचे चतकोर, मूठभर माणुसकी,  नाटके : कल्याणी, निर्णय
मुलांसाठी नाटक : आजीची छडी गोड गोड छडी
आत्मकथन : एरियल