साखरपट्टय़ातही विद्रोहाचे आकर्षण
 कबीर कला मंचचे सदस्य व संशयित नक्षलवादी शीतल साठे व सचिन माळी यांना शहरात एक वर्ष आश्रय देण्यात आला होता. सहकाराच्या बालेकिल्ल्यात आता परिवर्तनवादी विचाराबरोबरच नक्षलवादाचेही आकर्षण तरुणांमध्ये वाढू लागले आहे. विशेष म्हणजे दलितांबरोबरच गरीब मराठा समाजातील तरुणांचा यामध्ये विशेष सहभाग असून, अशा काही तरुणांची दहशतवादविरोधी पथकाने नुकतीच चौकशी केली.
शीतल साठे व सचिन माळी यांची गाणी ग्रामीण भागात विशेष लोकप्रिय होत असून, ही गीते दलित तरुणांबरोबरच आता मराठा तरुणही गाऊ लागले आहेत. ‘घुंगराची काठी दादा सावकाराच्या माथी हाण’, ‘आमची छाती रं फौलादी आम्ही शिवबाच्या औलादी’, ‘ऐ भगत सिंग तूजिंदा है’, ‘हर एक लहू के कतरे में’, ‘झोपडपट्टी रे’ ही गाणी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व शिवजयंतीला अनेक कलापथके गात आहेत.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातील झोपडपट्टय़ा, दलित वस्त्यांबरोबरच आता मराठा वस्त्यांमध्येही या कलापथकांचे कार्यक्रम तरुण आयोजित करत आहेत. मध्यमवर्गीय व गरीब मराठा कुटुंबातील तरुण ही गाणी केवळ गातच नाहीत, तर त्याच्या आयोजनाचा आर्थिक भारही स्वत:च्या खिशातून, वेळप्रसंगी वर्गणी जमा करून उचलत आहेत. या कलापथकांना आता काही लग्नसमारंभातही संधी दिली जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे पुरोगामी विचारांचे काही कार्यकर्ते परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न आल्याने कलाकारांना मदत करत आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथे सन २०११ मध्ये सुमारे आठ ते दहा महिने साठे व माळी यांचे वास्तव्य होते. पूर्वी बामसेफ व संभाजी ब्रिगेडमध्ये काम केलेल्या व आता डाव्या विचारांकडे झुकलेल्या धनंजय कानगुडे यांनी त्यांना आश्रय दिला होता. या काळात जिल्ह्य़ातील परिवर्तनवादी व विद्रोही चळवळीच्या कार्यकर्त्यांशी माळी व साठे यांचे संबंध आले. मात्र, साठे व माळी हे संशयित नक्षलवादी आहेत, याची कुणालाही कल्पना नव्हती. दोघांना अटक झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला. असे असले तरी दोघांचीही सुटका व्हावी, असा मानणारा एक मोठा वर्ग या भागात कार्यरत आहे. माळी याने श्रीरामपूर येथील वास्तव्यात ‘जातिअंतक सांस्कृतिक क्रांतीचे आत्मभान’ हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक औरंगाबाद येथील कॉम्रेड चंद्रगुप्त चौधरी स्मृती समितीने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाच्या प्रती विकण्यातही काही विद्रोही चळवळीच्या विचारांशी जोडलेले तरुण सहभागी होते. साठे व माळी यांना अटक झाल्यानंतर कानगुडे यांची दहशतवादविरोधी पथकाच्या नाशिक येथील अधिकाऱ्यांनी चौकशी केली. आता नगर जिल्ह्य़ातील काही कार्यकर्त्यांवर पथकाचे लक्ष असून, विविध कार्यक्रमांवर ते नजर ठेवून आहेत. माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत अध्यक्ष असलेल्या शिवराज्य पक्षाने पीपल्स प्रोटेक्शन फोर्सची स्थापना केली असून कानगुडे हे त्याचे राज्य समन्वयक आहेत.
मूळचा टिळकनगर येथील असलेला व पुण्यात स्थायिक झालेला सिद्धार्थ भोसले या संशयित नक्षलवादी तरुणाला एप्रिल २०११ मध्ये अटक करण्यात आली होती. बंद पडलेल्या टिळकनगर साखर कारखान्यात त्याचे वडील नोकरीला होते. त्याचे नातेवाईक याच भागात राहतात. त्याचाही मित्रपरिवार या भागात आहे, पण त्यांचे भोसले याच्या चळवळीशी यापूर्वी संबंध आढळून आले नव्हते. नगरच्या साखरपट्टय़ात आता नक्षलवादी विचाराबद्दल तरुणांमध्ये सहानुभूती वाढत आहे.