ग्रामीण भागातील उद्योग शहरात केंद्रित झाले आहेत. त्यामुळे खेडेगावातील लोक उद्योगाच्या मागे शहराकडे वळल्याने खेडेगाव ओस पडली आहेत. त्यासाठी केंद्रित उद्योगांचे विकेंद्रीकरण करून ग्रामीण भाग आर्थिकदृष्टय़ा सधन बनविले पाहिजेत. गोमाता माणसाला रोगमुक्त व करोडपती बनवू शकते असा विश्वास कणेरी सिद्धगिरी मठाधिपती प. पू. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी व्यक्त केला, तसेच गतसमृद्धी योजना सरकारकडे दिली आहे ती स्वीकारावी अशी अपेक्षादेखील व्यक्त केली. गोविज्ञान परिषद व औषधनिर्माण, सेंद्रिय शेती कार्यशाळा शुभारंभप्रसंगी प. पू. काडसिद्धेश्वर स्वामी बोलत होते. या वेळी हैदराबाद येथील भारतीय हवामान विज्ञानाचे माजी संचालक डॉ. रवि, कोकण विभाग कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, वैद्य गोविंद कासेखाट, राजेंद्र देवणीकर, अॅड. जयंत मुळेकर, जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर,  न्यू प्राइम अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष आदिनाथ येरम, सेंद्रिय शेती फेडरेशनचे अध्यक्ष बाळासाहेब परुळेकर, लुपीन फाऊंडेशनचे योगेश प्रभू, दीपक पांडा, जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी शेळके, जिल्हा कृषी प्रकल्प संचालक अडसुळे, तालुका कृषी अधिकारी प्रमोद सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र फाटक, उल्हासनगर येथील शांतिप्रसादचे दादा दौलतजी, रामानंद शिरोडकर, रणजित सावंत आदी उपस्थित होते.

१२५ कोटींच्या देशात फक्त ८ ते १० कोटी शेतकरी घराणी आहेत. देशाचा मुख्य व्यवसाय शेती, तर गोपालन उपव्यवसाय होता. मुख्य व्यवसायापाठोपाठ उपव्यवसायदेखील कमी होत आहेत. तुटपुंज्या क्षेत्रातील नोकरीसाठी गर्दी होत आहे. नोकरीकडेच सर्वाचा ओढा आहे, पण शेती व गोपालनात मुख्य व्यवसायात शक्ती आहे तीच बंद होत आहे. त्यामुळे देशातील सर्व उद्योग-व्यवसायात केंद्रित होऊन शहराकडे लोक स्थलांतरित झाले आहेत, असे प. पू. सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले. ग्रामसंस्कृतीच असणारे उद्योग शहराकडे केंद्रित झाले आहेत. अन्नप्रक्रिया उद्योगदेखील शहराकडे गेले आहेत, असे सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले. ग्रामसंस्कृतीत ऊर्जा मिळत होती, ती बंद झाली. त्यामुळे जैतापूरसारखे प्रकल्प आले, असे सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले. लाइट आली त्यासाठी वृक्षतोडही झाली. त्यामुळे आपण परावलंबी झाल्याचे सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले. गाई विकायला लागले, तर देशात आजही ७० ते ८० टक्के बैलावरच वाहतूक होत आहे. उद्योग, वीज, कापड उद्योग केंद्रित बनले आहेत. त्यामुळे जनतेचे शोषण सुरू आहे. खेडेगाव त्यामुळे बकाल बनत आहेत. ग्रामीण भागातील ७० टक्के लोकांची घरे कुलूपबंद, तर ३० टक्के लोक खेडय़ात आहेत. आज शेती बंद होत आहे. मनरेगात तांदूळ मिळतो आहे. सरकारच तांदूळ देत आहे. त्यामुळे शेतीत कामे कोण करत नाही, असे स्वामी म्हणाले.

अन्नपाण्याची दयनीय अवस्था बनली आहे. आता शहरातील उद्योग ग्रामीण भागात यायला हवेत. वीज, सोलर, गोबर गॅस असे प्रयोग निर्माण व्हायला हवेत. गोमाता आणि शेतीच्या आरोग्याचे संवर्धन व्हायला पाहिजे. विषमुक्त अन्न लोकांना मिळाले तर आजारदेखील कमी होतील, असे स्वामी म्हणाले. शेतीत जमिनीत पाणी मुरत नाही, त्यामुळे पाऊस किती पडला याला महत्त्व नाही. माती, पाणी, वृक्ष व पक्षी हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे. जिवाणू असतील तीच सेंद्रिय शेती म्हणावी लागेल. गाईच्या एक ग्रॅम शेणात चारशे कोटी जिवाणू निर्माण करण्याची क्षमता आहे. एक किलो शेणाची किंमत ४० हजार रुपये होते असे सांगत देशी गाईचे महत्त्व प.पू. काडसिद्धेश्वर स्वामींनी सांगितले.

विषाणू रोगमुक्त बनविण्याची ताकद गोमातेत आहे असे त्यांनी सांगून गुरुग्वे येथे ३३ लाख लोकसंख्येत १ कोटी २० लाख गाई आहेत, असे स्वामी म्हणाले. गोमाता माणसाला करोडपती बनवू शकते. गोमातेच्या गोमूत्र, दूध, शेण यांपासून अनेक उत्पादने बनवू शकतात. शेतकरी व ग्राहक एकमेकांना पूरक आहेत, असे प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले.

या वेळी हवामान विभागाचे माजी संचालक डॉ. रवि यांनी घरोघरी पावसाचे वेळापत्रक ठरवल्याचे एक तंत्रज्ञान सांगून राशी व नक्षत्रानुसार पाऊस केव्हा व कसा पडेल, तसेच पिकाची माहिती दिली. शेतकऱ्यांना उपयुक्त तंत्रज्ञान घरोघरी कसे करता येईल हेही त्यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग ऑरगॅनिक फेडरेशनचे अध्यक्ष बाळासाहेब परुळेकर यांनी गोमाता, विषमुक्त शेती आदींचे मार्गदर्शन केले. कोकण कृषी विभागाचे सहसंचालक अशोक लोखंडे यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करताना शासनाने सेंद्रिय शेती धोरण अमलात आणले असून, प्रथम १० टक्के सेंद्रिय शेती विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात १२८ शेतकरी गट बनवले जातील. प्रत्येक गटात ५० शेतकरी असतील. सिंधुदुर्गात असे ५० गट असतील, असे लोखंडे म्हणाले.

सिंधुदुर्गातील काजू ९० टक्के सेंद्रिय आहे. सेंद्रिय प्रमाणीकरण करून सिंधुदुर्ग काजू पिकात सेंद्रिय करण्याचे धोरण जाहीर केले. नाचणी, आंबा, नारळबाबतही लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. दादा दौलतराव यांनीही शेतीचा मार्ग सांगितला. जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी हिंदू संस्कृतीत गोमातेचे महत्त्व कथन करत जिल्हय़ात सेंद्रिय शेतीचे धोरण आखण्याचा मनोदय व्यक्त केला. जिल्हा सेंद्रिय शेती, गोसंवर्धनाचा विचार प्रभुगावकर यांनी व्यक्त केला. न्यू प्राइम अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष आदिनाथ येरम यांनी माडखोल येथे गोशाळा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त करत प्रथम १०८ आणि पाच वर्षांत ही संख्या वाढवली जाईल. गोमातेच्या दूध, शेण व गोमूत्रापासून वस्तू बनवल्या जातील असे येरम यांनी सांगून मुंबईत ५० केंद्रांत कोकणच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्याचा मनोदय व्यक्त केला. या वेळी प. पू. काडसिद्धेश्वर स्वामी यांचा सत्कार आदिनाथ येरम यांनी, तर अॅड. जयंत मुळेकर यांचा सत्कार स्वामींच्या हस्ते करण्यात आला. मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. रामानंद शिरोडकर यांनी स्वागत, तर सूत्रसंचालन रणजित सावंत यांनी केले. सर्वाची ओळख व प्रास्ताविक बाळासाहेब परुळेकर यांनी केले.