छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. या धर्म संसदेचा समारोप रविवारी झाला. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते. या कार्यक्रमात वक्त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिव्या दिल्याचा आणि नथुराम गोडसेचे कौतुक केल्याचा आरोप या कार्यक्रमाबाबत करण्यात आला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या अकोल्याचे रहिवासी असलेल्या कालीचरण महाराज यांनीही महात्मा गांधींविषयी अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरूनच आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ माजला असून नवाब मलिक यांनी कालीचरण महाराज यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

यावेळी अधिवेशनात बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले, “राष्ट्रपिता महात्मा गांधी हे देशातल्या प्रत्येक नागरिकाचं श्रद्धास्थान आहे. आपल्या राज्यातल्या एका भोंदू बाबाने त्याचं नाव कालीचरण महाराज असून तो अकोल्याचा रहिवासी आहे, त्याने आपल्या राष्ट्रपित्याला शिवीगाळ केली आहे. सोशल मीडियावर तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्याने देशभर, जगभर महात्मा गांधीचा अपमान केला आहे. बापूंच्या विचाराचा विरोध होऊ शकतो. पण गेल्या काही वर्षांत त्यांच्या खुन्याचे गोडवे गायले जात आहे. विचारांची लढाई विचारांनी होऊ शकते. पण म्हणून बापूंचा अपमान होऊ शकत नाही. कालीचरण महाराजवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा. महात्मा गांधींना शिवीगाळ केलेलं, अपमान केलेलं सहन करणार नाही. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी”.

हेही वाचा – धर्म संसदेत वादग्रस्त विधाने सुरूच; गोडसेचं कौतुक करत महात्मा गांधींसाठी वापरले अपशब्द, मुख्यमंत्र्यांनी सोडला कार्यक्रम

काय म्हणाले होते कालीचरण महाराज?

छत्तीसगडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत देशभरातून धर्माचे अनुयायी आणि महामंडलेश्वर आले होते. या कार्यक्रमात कालीचरण महाराज आणि उपस्थित अन्य काही जणांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शिव्या दिल्या. तसंच गांधींजींची हत्या केल्याबद्दल नथुराम गोडसेचे आभार मानल्याचाही आरोप करण्यात येत आहे. त्याचबरोबर या संसदेदरम्यान नथुराम गोडसेचं कौतुकही करण्यात आलं. त्यानंतर काल संध्याकाळी गांधीविरोधी वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराज यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या दोन दिवसीय धर्म संसदेला उपस्थित राहण्यासाठी आलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही अचानक या कार्यक्रमातून निघून गेले.

कालीचरण महाराज यांच्या विधानानंतर संसदेचे निमंत्रक दूधधारी मठाचे प्रमुख महंत राम सुंदर दास यांनी विरोध करत स्वतःला या धर्मसंसदेपासून दूर केलं. या धर्मसंसदेचा उद्देश फळाला न आल्याचंही ते म्हणाले. दरम्यान नंतर कालीचरण यांच्या विरोधात रविवारी रात्री उशिरा आयपीसीच्या कलम ५०५(२) आणि २९४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.