सावंतवाडी: कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी कणकवली शहर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले.
शहर विकास आघाडीची निर्मिती:
या नगरपरिषदेत भाजप-महायुतीमध्ये शिंदे शिवसेनेला डावलण्यात आल्यामुळे, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत ‘कणकवली शहर विकास आघाडी’ची स्थापना केली आहे. या आघाडीकडून कणकवलीचे माजी सरपंच आणि पहिले नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेले संदेश पारकर यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
जोरदार शक्तीप्रदर्शन आणि देवदर्शन:
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री. पारकर आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांनी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री देव स्वयंभू मंदिर तसेच भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर हे सर्वजण कार्यकर्त्यांसोबत जोरदार घोषणाबाजी करत कणकवली तहसील कार्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र सादर केले.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती:
अर्ज दाखल करताना शहर विकास आघाडीच्या अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) चे माजी आमदार राजन तेली, शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, राष्ट्रवादी (श.पा.) चे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, सरचिटणीस रुपेश जाधव, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शेखर राणे, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, प्रथमेश सावंत, युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, माजी नगरसेविका स्नेह उमेश वाळेक, प्रसाद अंधारी, अॅड. सुदीप कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात कणकवली येथे शहर विकास आघाडी स्थापन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
खासदार नारायण राणे यांच्या भूमिकेकडे लक्ष!
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना उध्दव ठाकरे गट एकत्र येऊन शहर विकास आघाडी केली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी सिंधुदुर्ग – रत्नागिरी जिल्ह्यात संबंध तोडणार असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर लक्ष वेधले आहे.
