कराड : रयत शिक्षण संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्याने येत्या जूनपासून हे विद्यापीठ उभे राहिलेले असेल, असा विश्वास देताना कर्मवीरांनी पाहिलेली सर्व स्वप्ने सत्यात उतरत असल्याचे सांगत याबाबत ‘रयत’चे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६३ व्या पुण्यतिथिनिमित्त सातारा येथे कर्मवीर समाधीस्थळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, रामशेठ ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी रयत शिक्षण संस्थेकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांनी बीजमाता राहीबाई पोपेरे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, रतनबाई गणपतराव देशमुख आदींचा सन्मान करण्यात आला.
शरद पवार म्हणाले, की कर्मवीरांनी शिक्षण कार्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचले. आज त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचा खऱ्या अर्थाने वटवृक्ष झाला आहे. तर, संस्थाचालकांनी या वटवृक्षाला सेंद्रिय खतपाणी घालण्याची जबाबदारी पेलल्याने त्याची फळे सर्वसामान्य वर्गातील मुलांना चाखायला मिळत आहेत. ‘रयत’च्या या वटवृक्षाची निरोगी वाढ होत असल्याने त्यातून गुणवंत पिढी घडून राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागत असल्याचा विश्वास पवार यांनी दिला. रयत परिवारातील ज्येष्ठ सदस्य प्रा. डॉ. एन. डी. पाटील, भाई गणपतराव देशमुख, डॉ. शंकरराव कोल्हे हे आज आपल्यात नसल्याची खंत व्यक्त करताना त्यांच्या आठवणींना शरद पवारांनी उजाळा दिला. पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेताना त्यांचे अभिनंदनही त्यांनी केले.
‘रयत’चे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला. प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी केले.