राजापूर : राज्यामध्ये पहिले ‘सोलर गाव’ म्हणून राजापूर तालुक्यातील कशेळी गाव ओळखले जाणार आहे. संपुर्ण गाव सोलरने प्रकाशमय करण्यात येणार असून लवकर या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे या कशेळी गावचे नाव देशाच्या नकाशावर आणखी ठळक होणार आहे.

भारतामधील तीन प्रमुख सूर्यमंदिरांपैकी एक मंदिर राजापूर तालुक्यातील कशेळी येथे आहे. हे गाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे ‘सोलर गाव ‘ ही संकल्पना या गावापासून राबवण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. या गावातील कुटुंबांशी नुकताच संवाद साधला असून सर्वांनी सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला अनुदानही दिले जाणार आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी कशेळी येथे बैठक घेतली. केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात सौरऊर्जा योजनेची घोषणा केली आहे. त्यामध्ये ४० टक्केपर्यंत सबसिडी मिळणार आहे. यामध्ये एक वॅट विजेसाठी ३० हजार रुपये, २ वॅटसाठी ६० हजार रुपये तर ३ वॅटसाठी ७८ हजार रुपये सबसिडी शासनाकडून दिली जाणार आहे.

शासनाने मंजुरी दिलेल्या कोणत्याही एजन्सीद्वारे लाभार्थी सोलर युनिट बसवू शकतो, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. ही योजना राबवण्यापूर्वी गावातील घरे, कुटुंबे, मंदिरे, दुकाने, कार्यालये यांचा सर्वे करण्यात आला होता. त्यानुसार कशेळी गावात ३१६ घरे असून, ६६५ कुटुंब आहेत. एक पॅनल बसवण्यासाठी सर्वसाधारण १ लाख ७० हजार रुपये खर्च येतो. कशेळी गावातील सर्वच कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी बँकांमार्फत कर्जयोजनेतून किंवा महावितरणकडून अन्य लाभ देता येतात का, याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली गेली. पावसाळ्यात सोलरमधून वीजनिर्मितीत कोणत्या अडचणी येतात का, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला होता. त्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सोलरचा सूर्याशी संबध असल्यामुळे कशेळी गावाची निवड केल्याचे या वेळी कृषी अधिकारी खरात यांनी सांगितले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, उपविभागीय अधिकारी डॉ. जॅस्मिन, कृषी विकास अधिकारी सुनील खरात, तहसीलदार गंबरे, गटविकास अधिकारी जगताप यांच्यासह बँक, महावितरण आणि अन्य खात्यांचे अधिकारी कशेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कशेळी गावामध्ये कनकादित्य मंदिर असल्यामुळे पर्यटनदृष्ट्या वेगळे महत्व आहे. हाच विचार करून शंभर टक्के गाव सोलर व्हिलेज बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या निकषांची माहिती दिली. यावर ३ महिन्यात कार्यवाही होणार आहे. पहिल्या टप्प्यात ५० टक्के लाभ घेणार आहे.” -कीर्तीकिरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी

  • एकूण घरांची संख्या : ६१६
  • कुटुंबांची संख्या : ९६५
  • अंगणवाडी संख्या : ६
  • शाळांची संख्या : ५
  • मंदिरांची संख्या : ७
  • शासकीय इमारती : ३