निवडणुकीच्या तोंडावर आमदार दिलीपराव व अमित देशमुखांनी माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांच्याशी तडजोडीचे राजकारण करताना त्यांच्या पत्नीला जि. प. चे अध्यक्षपद दिले. परंतु निवडणूक संपताच कव्हेकर यांचे पुन्हा ‘एकला चलो रे’ सुरू झाले. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांत त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
कव्हेकर यांनी आतापर्यंत सर्व पक्षांमध्ये प्रवेश करून राजकीय वर्तुळ पूर्ण केले. २००९ मधील निवडणुकीच्या वेळी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी कव्हेकरांना भाजपतून काँग्रेसमध्ये आणले. मात्र, विलासरावांच्या निधनानंतर कव्हेकरांनी काँग्रेसमध्ये आपला सवतासुभा सुरू केला. निवडणुकीची तयारी सुरू असताना लातूर शहर अथवा ग्रामीण या दोन्हींपकी एका मतदारसंघातून आपण काँग्रेसतर्फे िरगणात राहणार असल्याची घोषणा केली. त्यावर देशमुखांनी त्यांना फटकारलेही. त्यामुळे कव्हेकर आक्रमक होतील, असे वाटले होते. मात्र, श्रेष्ठींकडे डाळ शिजत नसल्यामुळे ते शांत बसले.
केंद्रातील सत्तापरिवर्तन व काँग्रेससाठी प्रतिकूल स्थिती यामुळे देशमुखांनी कव्हेकरांशी राजकीय तडजोड करून त्यांच्या पत्नीस जि. प. अध्यक्षपद बहाल केले. कव्हेकरांनी निवडणुकीत देशमुखांना विरोध केला नाही. मात्र, निवडणूक होताच जिल्हय़ातील दुष्काळी स्थितीबाबत लक्ष वेधताना सरकारने शेतकऱ्यांना एकरी २५ हजार अनुदान द्यावे, ग्रामीण व शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास त्वरित उपाययोजना करावी आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केल्या. सूर्यकांत शेळके, साहेबराव पाखरे आदी नेहमीचे समर्थक त्यांच्यासमवेत होते. कव्हेकरांनी पुन्हा ‘एकला चलो रे’ भूमिका घेत मागील पानावरून पुढे याचा प्रत्यय घडविल्यामुळे पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांत त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kavekar again ekla chalo re
First published on: 26-10-2014 at 01:51 IST