शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत निघालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ट्वीटद्वार भाजपावर निशाणा साधला होता. याला आता भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत सकल ‘हिंदू समाजा’च्या वतीने ‘हिंदू जनआक्रोश मोर्च’चं आयोजन करण्यात आलं होतं. लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि लॅण्ड जिहाद विरोधात कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू व्हावा, अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. “देशात नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन शक्तिमान नेत्यांचं राज्य आहे. महाराष्ट्रात सुद्धा हिंदूंचं राज्य आलं, असं सांगण्यात येत आहे. तरीही काढलेला आक्रोश मोर्चा योग्यच आहे. कारण, हिंदू समजले जाणाऱ्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही. म्हणून आक्रोश मोर्चा निघाला असेल तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे,” असं संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. हेही वाचा - शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? निवडणूक आयोगापुढे उद्या होणाऱ्या सुनावणीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले… याला प्रत्युत्तर देत भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी “पहिल्यांदा शिवसेना भवन हतबद्ध अन हळहळत असेल आज. सळसळत्या हिंदुत्वाचं हुंकार समोर आहे पण त्याला साथ देता येत नाही, कारण उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडल आणि आजच मुस्लिमांची परिषद घेणाऱ्यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दारात नेऊन ठेवलं. बाकी हिंदू समर्थ आहे.” असं म्हटलं आहे. संजय राऊतांचं ट्वीट - “शिवसेना भवन हेच हिंदूंचे एकमेव आशास्थान आहे हे आक्रोश मोर्चाने सिध्द केले. आठ वर्षांपासून शक्तिमान हिंदू नेत्यांचे राज्य असताना हिंदूंना आक्रोश करावा लागतो हे अपयश कोणाचे? काश्मिरात पंडितांचा आक्रोश. कारसेवकांच्या हत्या करणाऱ्या मौ. मुलायम यांना पद्मविभूषण हिंदू आक्रोश करणारच!” असं संजय राऊत ट्वीटद्वारे म्हणाले आहेत. हेही वाचा - “बागेश्वर बाबाने तुकोबारांयांबद्दल गरळ ओकली असताना राज्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते…” रोहित पवारांनी व्यक्त केला संताप! मुंबईत ‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने ‘हिंदू जनआक्रोश मोर्च’चं आज आयोजन करण्यात आलं होतं. लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि लॅण्ड जिहाद विरोधात कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू व्हावा यासाठी दादार (प) येथील मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली. कामगार मैदान, प्रभादेवी येथे या मोर्चाचा समारोप होणार आहे. मोर्चात भाजपा, शिंदे गट आणि हिंदू संघटनांचे नेते सहभागी झाले आहेत. तर, शिवसेनेचे ( ठाकरे गट ) नेते मोर्चात सहभागी झाले नसल्याचे भाजपाकडून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.