खारेपाट महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. झेप महिला औद्योगिक व उत्पादित सहकारी संस्था आणि पंचायत समिती अलिबाग यांच्या संयुक्त विद्यामाने तिनविरा इथे या मोहोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी आणि खारेपाटातील संस्कृतीचे दर्शन लोकांना व्हावे यासाठी २१ ते २५ डिसेंबरदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
 चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आगरी-कोळी आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन इथे येणाऱ्या पर्यटकांना घडवले जाणार आहे. त्याच बरोबर कोकणातील बाराबलुतेदार पद्धती, त्यांचे व्यवसाय याची ओळखही करून दिली जाणार असल्याचे महोत्सवाच्या संयोजिका चित्रा पाटील यांनी सांगितले. महोत्सवात पारंपरिक नृत्याबरोबरच फुड फेस्टिव्हलची धूम असणार आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात दिवसभर मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू असणार आहे.
महोत्सवाच्या सुरुवातीला १५० स्थानिक कलाकारांचा समूह खारेपाटातील लोकधारा हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तर दुसऱ्या दिवशी दशावतारी नाटक तर चौथ्या दिवशी अवधूत गुप्ते नाईट्सचे आयोजन केले जाणार आहे. महोत्सवात महिला बचतगटाने तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी १०० स्टॉल्सची उभारणी करण्यात आली आहे. तर मुलांसाठी फन फेअर झोनची उभारणी करण्यात आली आहे. येणाऱ्या पर्यटकांना बैलगाडी आणि घोडागाडीची रपेट मारता येणार आहे. तब्बल १ लाख स्केअर फुटांत हा भव्य महोत्सव साजरा केला जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन चित्रा पाटील यांनी केले आहे.