मुंबईतील आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी साक्षीदार बनलेला किरण गोसावी लखनऊमध्ये शरण येणार आहे. गोसावीवर त्याच्या अंगरक्षक प्रभाकर साईलने शाहरुखकडून कोट्यवधीची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. ड्रग्ज प्रकरण समोर आल्यापासून गोसावी चर्चेत आहे. सुरुवातीच्या काळात आर्यन खानसोबत त्याचा एक सेल्फीही व्हायरल झाला होता. मात्र, त्यानंतर किरण गोसावी फरार झाल्यामुळे त्याच्याबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे. या दरम्यान गोसावी उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांना शरण येणार आहे. यापुर्वी पुणे पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीला अटक केली आहे.

गोसावीने इंडिया टुडेला सांगितले, “मला स्वतःला महाराष्ट्र पोलिसांकडे सोपवायचे होते, परंतु या राजकीय मुद्यांमुळे मी स्वतःला लपवत होतो. मला क्रूज पार्टी ड्रग प्रकरणाबद्दल सत्य सांगायचे आहे. पुण्यात अटकेनंतर माझा वाईट छळ होईल असे मला कोणीतरी सांगितले होते.”

किरण गोसावी म्हणाला, “मी १५ मिनिटांत शरण जाणार आहे. महाराष्ट्रात माझा जीव धोक्यात आहे, त्यामुळे मी लखनौमध्ये आत्मसमर्पण करणार आहे. मला सातत्याने धमकीचे फोन येत आहेत.”

अंगरक्षक प्रभाकर साईलने केलेला खंडणीचा आरोप फेटाळून लावत गोसावी म्हणाला की, “जर त्याने आरोप लावले असतील तर त्याच्याकडे पुरावेही असतील. त्याने ते पुरावे समोर ठेवले पाहिजेत. मी पैसे घेतलेले नाहीत. आतापर्यंत स्वत:ला वाचवण्यासाठी मी लपून बसलो होतो, मात्र आज मी आत्मसमर्पण करणार आहे.”

आर्यन खान प्रकरणानंतर गायब झालेल्या किरण गोसावीच्या मैत्रिणीला अटक!

काय आहे प्रकरण?

या प्रकरणी फरासखाना पोलिस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये कसबा पेठ परिसरात राहणारा चिन्मय देशमुख हा नोकरीच्या शोधत होता. त्यावेळी त्याची किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांच्या सोबत ऑनलाईन ओळख झाली. या दोघांनी चिन्मयला मलेशियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे सांगितले. त्यावर त्याच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार चिन्मयने तीन लाख रुपये दिले. मात्र तरी देखील नोकरी बाबत काही सांगितले गेले नाही. त्यावर अखेर त्यांनी फसवणुक झाल्याची तक्रार दिली.

या तक्रारीच्या आधारे किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांना पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र त्याला दोघांनीही काही प्रतिसाद दिला नाही. त्यावर दोघा आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार किरण गोसावीची मैत्रीण शेरबानो कुरेशी हिला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, किरण गोसावीविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली आहे.