scorecardresearch

“पक्षात दोन-तीन महिला आहेत, त्यापैकी एकही लायक नाही का?”, मंत्रीमंडळ विस्तारावरून किशोरी पेडणेकरांची टीका

राज्याच्या मंत्रीमंडळात एकही महिला नसल्याने अनेकांकडून टीका होते आहे.

“पक्षात दोन-तीन महिला आहेत, त्यापैकी एकही लायक नाही का?”, मंत्रीमंडळ विस्तारावरून किशोरी पेडणेकरांची टीका
संग्रहित

गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, यात एकही महिला नसल्याने अनेकांकडून टीका होते आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. यांच्या पक्षात ज्या दोन-तीन महिला आहेत. त्यापैकी एकही मंत्रीपदासाठी लायक नाहीत का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच संजय राठोड यांच्या मंत्रीपदावरून त्यांनी भाजपाला चिमटा काढला आहे.

नेमकं काय म्हणाल्या किशोरी पेडणेकर?

“बोल गया सबकुछ लेकींन याद नही अब कुछ, अशी या सरकारची परिस्थिती आहे. आम्ही किती संवेदनशील आहोत, याचं एक चित्र निर्णाण केलं गेलं होतं. मात्र, आता तो भोपळा फुटला आहे. यांच्या मंत्रीमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र, एका महिलेने ज्या व्यक्तीमुळे आत्महत्या केली. त्या व्यक्तीला मंत्रीमंडळात घेण्यात आले आहे.”, अशी टीका किशोरी पेडणकर यांनी केली आहे. तसेच “यांच्या पक्षात दोन तीन महिला उरल्या आहेत, त्यापैकी एकही मंत्रीपदासाठी लायक नाहीत का?”, अशा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा – “मी स्वत:साठी कधीच नाराज होणार नाही, पण…”, बच्चू कडूंची मंत्रीमंडळ विस्तारावर सूचक प्रतिक्रिया!

भाजपालाही काढला चिमटा?

“पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता त्याच राठोड यांना पुन्हा मंत्री करण्यात आलं आहे, त्यावेळी भाजपानेही रानं उठवलं होतं, चित्रा वाघ यांनी तर आभाळ-पताळ एक केलं होतं. मात्र, आता राठोड यांना मंत्री करण्यात आलं आहे. त्यामुळे तेंव्हा बडबड करणारे पोपट आता कुठं गेले.”, असा खोचक टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.

“यावेळी आईचंही नाव नाही?”

“आम्ही हा मंत्रीमंडळ विस्तार काळजीपूर्वक बघत होतो. यावेळी कोणीही बाळासाहेब किंवा स्वत:च्या आईचे नाव घेतले नाही. मागच्या वेळी अनेकांनी बाळासाहेबांचे तर कोणी आपल्या आईंचे नाव घेतले होते. तसेच यापैकी कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही घेतले नाही. ही वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे”, असेही त्या म्हणाल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.