गेली वर्षभर संघर्षांचा केंद्रबिंदू ठरलेला कोल्हापुरातील टोल शनिवारी रद्द करण्यात आला. या टोलविरोधात सुरू असलेल्या उपोषणस्थळी  कामगार मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी याची घोषणा केली. तसेच याबाबत आयआरबी कंपनीला रस्ते प्रकल्पाची किंमत महापालिकेकडून भागवली जाईल, असे लेखी हमीपत्रही या मंत्रीद्वयांनी दिले आहे. दरम्यान हे आश्वासन मिळताच या विरोधात सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले.
कोल्हापूर शहरांतर्गत रस्ते कामाबद्दल आयआरबी कंपनीकडून शहरातील प्रवेशासाठी पथकर सुरू करण्यात आलेला होता. रस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याचा आरोप करीत या टोलला करवीरवासीयांकडून प्रखर विरोध होत होता. यासाठी उग्र आंदोलन उभे करण्यात आले होते. पण या पाश्र्वभूमीवरही ही वसुली कंपनीने सुरू केली होती. याबाबत गेल्या काही दिवसांपासून टोल विरोधी कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. यातील काही आंदोलकांची प्रकृतीही ढासळली होती. शिवसेनेही शनिवारी विशाल मोर्चा आणि घेरावो आंदोलन करत शहरातील दळणवळण ठप्प केले होते.
दरम्यान दुपारी ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी.पाटील यांनीही आंदोलनास सुरुवात केल्याने शासनावरील दबाव वाढला गेला. या लोकभावनेची दखल घेत मंत्रीद्वयांनी संध्याकाळी कोल्हापूरचा हा टोल पंचगंगेत बुडवत आहे, असे घोषित करत तो मागे घेतल्याची घोषणा केली.