टोल आकारणीस विरोध दर्शविण्यासाठी सोमवारी शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या बंदला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्व व्यवहार ठप्प होते. निषेध फेरीनंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी बंद यशस्वी झाल्याचे नमूद करून संक्रांत सण लक्षात घेऊन बंद मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा केली.
टोलच्या विरोधात रविवारी जनउद्रेक उफाळून आला. आयआरबी कंपनीच्या टोलनाक्यांची प्रचंड नासधूस करण्यात आली. या आंदोलनात उतरलेल्या आंदोलकांना हर्षवर्धन पाटील यांनी समाजकंटक असे संबोधल्याने त्यांचा निषेध नोंदविण्यासाठी आणि कामगारमंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी टोल रद्दची फसवी घोषणा केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने हा बंद पुकारला होता. सकाळपासूनच शहरातील सर्व व्यापारी पेठा, दुकाने कडकडीत बंद होती. एस.टी., केएमटी, रिक्षा हे मात्र नियमितपणे सुरू होते. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. शिवसेनेने सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शिवाजी चौकात पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत तो हिसकावून घेतला. यातून पोलीस व शिवसनिकांत काही काळ झटापट झाली. पुतळा हिसकावून घेतला तरी शिवसनिकांनी गनिमा कावा करीत हर्षवर्धन पाटील यांचे छायाचित्र असलेले बॅनर पेटवून देऊन आपला संताप व्यक्त केला.
रविवारी टोलनाक्यांची नासधूस केल्याप्रकरणी महापौर सुनीता राऊत, आमदार चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासह सुमारे दीड हजार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलीस उपअधीक्षक विठ्ठल पवार यांनी गुन्हा दाखल झालेल्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचे नमूद करून त्या दिशेने कारवाई सुरू झाल्याचे सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार टोल नाक्यांना संरक्षण पुरविले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
टोल आंदोलन राज्यभर- शेट्टी
टोलविरोधी आंदोलनात गेल्या तीन वर्षांपासून असलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी टोलविरोधातील आंदोलन राज्यभर पसरविण्याचा इरादा सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
मनसे कार्यकर्त्यांना अटक
टोलनाक्याचा एक सांगाडा मनसेच्या कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीत नेऊन बुडविला होता. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, शहराध्यक्ष राजू िदडोर्ले, जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, जिल्हा सचिव प्रसाद पाटील या चौघांना अटक केली.