देशाचे सर्वोच्च स्थान भूषविलेले व्यक्तिमत्त्व समारंभासाठी येणार म्हणून संयोजकांनी बराचसा खर्च करून भव्य खुर्ची मंचावर ठेवलेली. पाहुणे आले, त्यांनी आपल्यासाठीचा हा वेगळा दर्जा पाहून संयोजकांना खुर्ची हटविण्यास सांगितली आणि इतरांसाठी असलेलीच साधी खुर्ची मागवून त्यावर ते विराजमान झाले… हा विनम्र भाव होता तो माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा. कोल्हापूर जिल्ह्यातील हरळी या गावातील शाळेला भेट दिल्यानंतर या ‘मिसाईल मॅन’च्या मेणाहूनही मऊ स्वभावाचे दर्शन झाल्याने खेडय़ापाडय़ातील जनताही भारावून गेली. अन् दीड हजाराहून अधिक विद्यार्थी थेट राष्ट्रपतीच आपल्याशी मित्रत्वाच्या नात्याने प्रश्नोत्तरे, संवाद साधत आहेत हे पाहून नखशिखान्त रोमांचित झाली.
डॉ. कलाम यांचा २ ऑगस्ट २०१२ रोजीचा हा कोल्हापुरातील एक प्रसंग. सिम्बायोसिस शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण शां. ब. मुजुमदार यांनी गडिहग्लज तालुक्यातील आपल्या हरळी या गावी ७ कोटी रुपये खर्च करून मराठी शाळेची भव्यदिव्य इमारत बांधायचे ठरवले. त्याचे कोनशिला पूजन डॉ. कलाम यांच्या हस्ते झाले. राष्ट्रपतिपद भूषवलेल्या या व्यक्तिमत्त्वाने आपल्या बडेजावपणाची वस्त्रे बाजूला सारून विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. भारत महासत्ता व्हायचे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काय संकल्पना आहेत, तुम्हाला मोठेपणी काय व्हायला आवडेल, असा चच्रेचा सूर ठेवत डॉ. कलाम यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले. खेडय़ातील मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तके वाचावयास मिळत नाहीत, हे लक्षात घेऊन डॉ. कलाम यांनी मुख्याध्यापक दत्ता देशपांडे यांना मंचावर बोलावून आपले ५० ग्रंथ भेट स्वरूपात दिले. हीच पुस्तके आता या शाळेतील विद्यार्थ्यांची ज्ञानलालसा भागवत आहेत. केवळ याच नव्हेतर कोल्हापूर जिल्ह्यातील डॉ. कलाम यांच्या बऱ्याच दौऱ्यांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा उलगडा होत गेला. ज्ञानतपस्वी असलेला हा शास्त्रज्ञ जनमानसाशी संवाद साधताना मात्र किती ऋजू स्वभावाचा आहे याच्या दर्शनाने करवीरकरांच्या मनात त्यांची प्रतिमा आणि प्रतिभा खोलवर रुजली आहे.
फेब्रुवारी २०१० मध्ये डॉ. कलाम यांनी तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या सुवर्णमहोत्सवी समारंभास उपस्थिती लावली. त्यांनी वारणा परिसरातील सहकार चळवळीविषयी गौरवोद्गार काढले. शिवाजी विद्यापीठाच्या जानेवारी २०००मध्ये झालेल्या दीक्षान्त समारंभात त्यांच्या हस्ते दिवंगत ज्येष्ठ चित्रकार चंद्रकांत मांडरे व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना डी.लिट ही सन्मानदर्शक उपाधी देण्यात आली. वारणा परिसर असो की शिवाजी विद्यापीठ येथेही डॉ. कलाम यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास बातचीत केली होती.
शास्त्रज्ञ असलेल्या डॉ. कलामांना करवीरनगरीतील संशोधनाविषयी नेहमीच कुतूहल राहिले. त्यांनी येथील डॉ. सतीश पत्की यांच्या मातेच्या दुधातील ‘स्टेम सेल’ संशोधनाचे महत्त्व समजून घेतले होते. तर तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पुढाकाराने राबवल्या गेलेल्या ‘सेव्ह द बेबी गर्ल’ या स्त्रीभ्रूणाची जपणूक करणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले होते. अशा अनेक आठवणींना आज करवीरकर उजाळा देत होते.