अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीतील मुलीवरील सामूहिक अत्याचार व हत्या प्रकरणातील नराधमांना विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी दोषी ठरवले. राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात २२ नोव्हेंबररोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.

कोपर्डी येथील घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. सर्वच स्तरावर या घटनेतील आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली जात होती. अखेर या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला असून तिन्ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२३) अशी या दोषींची नावे आहेत. या प्रकरणाच्या घटनाक्रमाचा घेतलेला हा आढावा…

१३ जुलै २०१६
कोपर्डीत राहणारी १५ वर्षांची मुलगी नववीत शिकत होती.  पीडित मुलीवर नराधमांनी १३ जुलै २०१६ रोजी संध्याकाळी अत्याचार केला. पीडित मुलगी आजोबांच्या घरी जात असताना नराधमांनी दुचाकीवरुन तिचा पाठलाग केला आणि गावातील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या केली.

१५ जुलै २०१६
कोपर्डी प्रकरणात पहिली अटक, जितेंद्र शिंदेला श्रीगोंद्यातून अटक

१६ जुलै २०१६
आरोपी संतोष गोरख भवाळ (३०) याला अटक

१७ जुलै २०१६
तिसरा आरोपी नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) याला अटक.

आरोपींवर अंडी फेकून मारण्याचा प्रयत्न
१७ जुलैरोजी आरोपींना न्यायालयात सुनावणीसाठी आणले असता शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपींवर अंडी फेकण्याचा प्रयत्न केला.

१८ जुलै २०१६
कोपर्डी प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटू लागले. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे निघत होते. विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता असल्याने पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

७ ऑक्टोबर २०१६
कोपर्डीतील तिन्ही आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल. घटनेच्या ८६ दिवसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आले. घटनेनंतर एक महिन्यात दोषारोपपत्र दाखल करु, असे पोलिसांनी सुरुवातीला सांगितले होते. मात्र तपासात त्रुटी राहू नये यासाठी प्रयत्न केले जात होते. तसेच प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त होण्यास अवधी लागल्याने त्यासाठी वेळ लागला. हत्या, बलात्कार, बालकांचा लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ अशा विविध कलमांचा आरोपपत्रात समावेश होता.

२० ऑक्टोबर २०१६
खटल्याच्या सुनावणीला सुरुवात

१ एप्रिल २०१७
शिवबा संघटनेच्या चार कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारात आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न केला.

२४ मे २०१७
खटल्यातील साक्षीदार तपासण्याचे काम पूर्ण.

२ जुलै २०१७ –
कोपर्डीत सूर्योदय संस्थेच्यावतीने निर्भयाचं स्मारक बांधण्याच निर्णय

१३ जुलै २०१७
कोपर्डीच्या घटनेला एक वर्ष पूर्ण. राज्यभरातून आलेल्यांनी कोपर्डीत पीडितेला श्रद्धांजली वाहिली व पीडित कुटुंबीयांना आधार दिला.

९ ऑक्टोबर २०१७
खटल्याची सुनावणी पूर्ण

१८ नोव्हेंबर २०१७
तिन्ही नराधमांना न्यायालयाने दोषी ठरवले