पीडित मुलीच्या भावाची तक्रार
कोपर्डी अत्याचार प्रकरणातील पीडित मुलीच्या भावाने आपल्यासह अन्य नातेवाईकांना आरोपीच्या नातेवाईकांनी धमकी दिल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दिली आहे. तालुक्यातील कुळधरण येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली, असे त्याने या तक्रारीत म्हटले आहे.कर्जत पोलिसांनी या तक्रार अर्जाला दुजोरा दिला. मात्र शनिवारी रात्री उशिरापर्यंत त्यावर फिर्याद दाखल झाली नव्हती. रात्री उशिरा ही प्रक्रिया सुरू होती. पिडीत मुलीच्या भावाने या तक्रार अर्जात म्हटले आहे की, शुक्रवारी नातवाईकांसह कुळधरण येथे देवीच्या दर्शनाला गेलो असता रात्री १० च्या सुमारास हौसराव शिंदे, दाजीराम शिंदे, बबन गजरमल, पप्पू गजरमल, सुरज गजरमल हे मंदिराबाहेरच आमच्या नातेवाईक महिलांचे चित्रण करीत होते. लगेचच त्यांनी येथे मंदिरात का आलात, असा जाब विचारून तुझ्या बहिणीच्या हत्या प्रकरणात आमच्या भावाला गुन्ह्य़ात अडकवले, अशी ओळख दाखवून परत इकडे येऊ नका, अन्यथा कोपर्डीपेक्षा भयानक स्थिती करू, अशी धमकी दिली, असे या तक्रार अर्जात म्हटले आहे.
दरम्यान कुळधरण येथेच शनिवारी सकाळी हवेतील गोळीबाराबाबतचा गुन्हा दाखल झाला असून बबन गजरमल याने ही फिर्याद दिली आहे. या दोन्ही गुन्ह्य़ांचा परस्परांशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त होते.