Ladki Bahin Yojana : ऑगस्ट २०२४ मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु झाली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हा एकनाथ शिंदे होते. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात आले. या योजनेचा लाभ पात्र नसणाऱ्या महिलांनी तर घेतलाच शिवाय १४ हजारांहून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक बाब या योजनेच्या छाननीतून समोर आली आहे. अपात्र महिलांना या योजनेतून काढून टाकण्यात आलं आहे. दरम्यान १४ हजार २९८ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
किती पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर?
१४,२९८ पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. त्यांना दरमहा २ कोटी १४ लाखांहून अधिक रक्कम वाटली गेली जी रक्कम सध्याच्या घडीला २१ कोटी ४४ लाखांच्या घरात आहे. ऑगस्ट २०२४ पासून छाननी होईपर्यंत हा लाभ पुरुषांना मिळाल्याचं समोर आलं आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतील माहिती तपासल्यावर आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या. २ लाख ३६ हजार १४ लाभार्थ्यांच्या नावांमध्ये संशय आहे. ते पुरुष असून त्यांनी महिलांच्या नावाने लाभ घेतला असावा, असा संशय आहे. ज्या १४,२९८ पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला, त्यांना दरमहा मिळणारं १५०० रुपये मानधन आता बंद करण्यात आलं आहे. योजनेत झालेल्या या गैरप्रकारामुळे महिलांच्या योजनेतून पुरुषांनी अर्ज करुन पैसे कसे मिळवले, हे शोधण्यासाठी आता कागदपत्रांची छाननी सुरू करण्यात आली आहे.
नियम डावलून महिलांनीही पैसे घेतल्याचे प्रकार छाननीत समोर
नियमानुसार ६५ वर्षांवरील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत नाही. तरीही, २ लाख ८७ हजार ८०३ वयोवृद्ध महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. या महिलांनांही या योजनेच्या अंतर्गत कोट्यवधी रुपये मिळाल्याचं छाननीत लक्षात आलं आहे. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. असं असतानाही, ७ लाख ९७ हजार ७५१ कुटुंबांतील दोनपेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यांना १,१९६ कोटी ६२ लाख रुपये मिळाले असल्याचं समोर आलं आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
किती बहिणींना अजूनही पैसे मिळणार
दरम्यान सरकारने २६.३४ लाख लाडक्या बहिणींना अपात्र केले असले तरी पात्र असलेल्या सुमारे २.२५ कोटी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्यात आला आहे, असेही आदिती तटकरे यांनी सांगितले.