Ladki Bahin Yojana Deepak Kesarkar Gives Hint on First Cabinet Decision : नुकतीच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पार पडली असून राज्यात महायुतीला बहुमत मिळालं आहे. निवडणुकीच्या निकालानंतर आज १२ दिवसांनी नवं सरकार स्थापन होणार असून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तसेच त्यांच्याबरोबर दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा खूप फायदा झाला आहे. महिला मतदारांना आकर्षित करण्यात ही योजना प्रभावी ठरली, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. तसेच महायुतीच्या नेत्यांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये दिले जात आहे. निवडणुकीमुळे या योजनेचे पैसे वितरित करणं थांबवण्यात आलं होतं. मात्र निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा सत्ता मिळाल्यास आम्ही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये देऊ असं आश्वासन महायुतीने निवडणुकीच्या आधी प्रचार करताना दिलं होतं. त्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींना म्हणजेच या योजनेतील पात्र महिलांना योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. तसेच २,१०० रुपये कधीपासून मिळणार असा प्रश्न सर्व महिलांच्या मनात आहे.

दरम्यान, आज नवं सरकार स्थापन झाल्यानंतर नव्या कॅबिनेटची (राज्य मंत्रिमंडळ) पहिली बैठक होईल. या बैठकीत लाडकी बहीण योजनेबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असं वक्तव्य माजी मंत्री व शिवसेना (शिंदे) आमदार दीपक केसरकर यांनी केलं आहे.

हे ही वाचा >> “आज फक्त तिघांचाच शपथविधी”; बाकीच्या आमदारांना कधी संधी मिळणार? मुनगंटीवारांनी महायुतीचं पुढचं नियोजन सांगितलं

लाडकी बहीण योजनेबाबत दीपक केसरकरांचं सूचक वक्तव्य

केसरकर यांनी काही वेळापूर्वी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत केली. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की आज देवेंद्र फडणवीस व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर नव्या सरकारची पहिली कॅबिनेट बैठक होईल. या बैठकीत कोणते निर्णय घेतले जातील? यावर केसरकर म्हणाले, “नव्या सरकारच्या पहिल्या बैठकीत सर्वप्रथम शेतकऱ्यांसाठी एखादा मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. आम्ही निवडणुकीच्या आधी घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपयांचा हप्ता वितरीत करू. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याबाबत एखादा निर्णय घेतला जाऊ शकतो. विधनसभेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी त्यासंदर्भातील पूरक तरतूद (Supplementary Provision) केली जाऊ शकते.

हे ही वाचा >> राष्ट्रवादीने नव्या सरकारमध्ये किती मंत्रीपदं मागितली? माजी खासदाराने नेमकी संख्याच सांगितली; शिवसेनेचा उल्लेख करत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार?

राज्यातील दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात होता. निवडणुकीआधी ज्या ज्या महिलांनी अर्ज केला, त्या सगळ्यांनाच दर महिन्याला १,५०० रुपयांचा हप्ता दिला गेला. त्याचबरोबर निवडणुकीनंतर सत्ता आल्यास २,१०० रुपयांचा हप्ता देऊ, असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं. मात्र हे पैसे आता फक्त गरजवंत महिलांना मिळावेत, यासाठी हालचाली केल्या जात आहेत. त्यामुळेच अर्जदारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया राबवली जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महिलांच्या अर्जाची छाननी केली जाणार असून केवळ गरजू महिलांनाच अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता यावी, यासाठी ही पडताळणी केली जाणार आहे. पडताळणीमध्ये जे अर्जदार निकषांची पूर्तता करणारे नसतील त्यांना सदर योजनेतून बाद केलं जाईल.