Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केली असून आतापर्यंत दीड कोटीहून अधिक महिला पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी कोट्यवधी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचा निधीही जमा झाला आहे. मात्र, आता योजनावरून महाविकास आघाडीने टीका केली आहे. तर ही योजना बंद व्हावी याकरता काँग्रेसने कोर्टात धाव घेतली आहे. यावरून राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय. ते जन सन्मान यात्रेनिमित्त चिपळून येथे बोलत होते.

“गोर गरिबांना आम्ही मदत करतो. पण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले लोक याची चेष्टा करतात. काँग्रेसवाले म्हणतात आम्ही योजना बंद करू. का तुमच्या बापाच्या घरची योजना आहे का? हा जनतेचा पैसा आहे. मला बाप काढायचा नव्हता. तुमच्या वडिलांच्या घरची योजना आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा >> Ladki Bahin Yojana : ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भरलेल्या अर्जाचे पैसे कधी येणार? लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांनी दिली माहिती

…तर महायुतीचं सरकार निवडून आणा

“महिलांना खूप काही कळतं. कारण महिला घरात राबराब राबते. सर्वांत आधी घरात कोण उठते. पुरुष माणसं आले की त्यांना लगेच जेवायला देतात. पण घर कोण बंद करणार. आहे ना बायको? तू काय करतो? तू फक्त झोपा काढतो. २४ तासांत माझी माय माऊली, मुलगी खूप काम करते. मग त्यांना काही मिळायला नको का.. पण काहीजण कोर्टात गेले. विरोधकांनी कोर्टात जावं? माझी तुम्हाला विनंती आहे की ही योजना पुढे पाच वर्षे चालवायची असेल तर महायुतीचं सरकार पुन्हा आलं पाहिजे”, असं अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शासकीय योजनांची पूरक माहिती देण्यासाठी आम्ही ही जन सन्मान यात्रा राज्यभर काढली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मायमाऊलींना आम्ही जे पैसे देत आहोत, ते पुढेही सुरूच राहतील. त्यात कुठेही खंड पडणार नाही, असा शब्द देतो. आपलं घर मोठ्या कष्टानं चालवणाऱ्या भगिनींना सक्षम आणि सबल करण्यासाठी आम्ही ही योजना आणली. जनतेचा पैसा आम्ही जनतेला देत आहोत, त्यातून स्थानिक व्यावसायिकांना सुद्धा फायदा होतोय. अनेक शासकीय योजना सर्व समाज घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही राज्यभर राबवत आहोत. या योजना दीर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी विधानसभा निवडणुकीत आम्हाला भक्कम पाठिंबा द्या, अशी विनंती करतो”, असंही अजित पवार म्हणाले.