पती पत्नीचं नातं अनोखं असतं असं म्हणतात. परंतु कोणत्या कारणावरून त्यांच्यात वाद होतील हे सांगता येत नाही. क्षुल्लक कारणावरून पत्नीनं आपल्या पतीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून डोकं फोडल्याची घटना सोलापुरातील बार्शी तालुक्यात घडली. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, पतीच्या तक्रारीनंतर पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उजेश असं संबंधित व्यक्तीचं नाव असून तो बार्शीतील एका गावात आपल्या पत्नी आणि मुलींसह राहतो. रात्रीचं जेवण आटोपून तो आपल्या घरातील हॉलमध्ये झोपला होता. तर त्याची पत्नी आपल्या मुलीसह स्वयंपाकघरात झोपली होती. दरम्यान, रात्री तहान लागल्यानं तो जागा झाला आणि स्वयंपाकघराचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी झोपेत असलेली पत्नी जागी झाली.
त्यानं आपल्या पत्नीकडे पाणी देण्याची विनंती केली. परंतु पत्नीनं आपण पाणी देणार नसल्याचं रागात सांगितलं. तसंच ज्या ठिकाणी पाणी जाऊन प्यायचंय त्या ठिकाणी जाऊन पी असं सांगितलं. त्यानंतर त्याच्या पत्नीनं स्वयंपाकघरात ठेवलेली कुऱ्हाडच आपल्या पतीच्या डोक्यात मारली. दरम्यान, उजेशच्या डोक्याला जबर दुखापत झाली आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.