सोलापूर : अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अशा नामघोषात अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या उत्सवात सुमारे दोन लाख भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. मंदिराच्या इतिहासात प्रथमच भाविकांना दर्शनासाठी मंदिर २२ तास खुले ठेवण्यात आले होते.
श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानल्या गेलेल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे. त्यातच आज गुरुवारचा योग जुळून आल्याने भाविकांची पहाटेपासून मंदिराच्या परिसरात प्रचंड गर्दी उसळली होती. पहाटे दोन वाजता दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होते. मध्यरात्री बारापर्यंत दर्शन रांग सुरू होती. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दुपारनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले, प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले आणि सचिव शामराव मोरे यांनी याचे नियोजन केले.
वटवृक्ष देवस्थानात पहाटे काकड आरती झाल्यानंतर मंदिराचे पुरोहित मोहन पुजारी आणि मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते गुरुपूजन झाले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे हे उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन आणि गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दुपारी श्रींना महानैवेद्य अर्पण करण्यात आला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, भाजपचे नेते मिलन कल्याणशेट्टी, शिवाजीराव फुंदे (मुंबई), जालना जिल्ह्यातील पळसखेडा येथील नागेश्वर संस्थानचे गंजीधर महाराज, सनदी लेखापाल महेश गावस्कर (पुणे), पुण्याच्या अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष जनार्दन उर्फ अण्णा थोरात, देडगीदार प्रभाकर शिंदे (छत्रपती संभाजीनगर) आदींच्या हस्ते महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात आला. तर सायंकाळी श्रींची पालखी आणि मिरवणुकीचा शुभारंभ भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, मुंबईच्या सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज, शिवसेना सोलापूर जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, संकेत पिसे, ॲड. नितीन हबीब आदींच्या उपस्थितीत करण्यात आला.
गुरुपौर्णिमा आणि अन्नछत्र मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त गेले दहा दिवस सांस्कृतिक धर्म संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यात राधा मंगेशकर, आदेश बांदेकर, बेला शेंडे, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील सर्व कलाकार, निवृत्ती महाराज इंदोरीकर, नितीन बानगुडे-पाटील आदींनी हजेरी लावली होती.