विठ्ठलाच्या भेटीचा ध्यास अन् आषाढीच्या सोहळ्याची आस घेऊन १९ दिवस पायी प्रवास करून वारकरी पंढरीत पोहोचतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर अलौकिक आनंदाची लकेर आपसूकच उमटते. वारीच्या वाटेवर जितका सेवाभाव अनुभवण्यास मिळतो, त्याहून कितीतरी अधिक गैरसोयीची परिस्थिती पंढरपुरात निर्माण होते. मात्र, वाटेत ऊन, वारा, पाऊस आदी कशाचीही तमा न बाळगता चालणाऱ्या वारकऱ्याला या गैरसोयींचीही तमा नसते. त्याच्यासाठी विठ्ठलाची भेट व वारी पूर्ण झाल्याचे समाधान सर्वात महत्त्वाचे असते.
विठ्ठलाचे प्रत्यक्षात मुखदर्शन घेण्यासाठी काही किलोमीटपर्यंत रांग असते. माउली व तुकोबांच्या संगतीने पंढरीत दाखल झालेला बहुतांश वारकरी मात्र या रांगेचा भाग होत नाही. वारी पूर्ण करून केवळ विठ्ठल मंदिराच्या कळसाचेच दर्शन घेऊन तो समाधानी होतो. विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन करीत आलेला वारकरी केवळ कळसाचेच दर्शन घेतो, या अनोख्या भक्तीचे कोडे कधी उलगडत नाही. याच वारकऱ्यांपैकी काही जण अतिशय खडतर असलेली परतीची वारीही करतात, तर काहींची वारी दोन महिनेही संपत नाही.
पालख्या पंढरपुरात दाखल होण्यापूर्वीच विठ्ठलाच्या मुखदर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. िदडय़ातील वारकरी पालखी सोडून जात नाही. पालख्या पंढरपुरात पोहोचल्यानंतर आषाढीच्या दिवशी पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा असते. ही प्रदक्षिणा व त्याचवेळी होणारे कळसाचे दर्शन हीच त्याच्या दृष्टीने विठ्ठलाची खरी भेट असते. त्यामुळे हा वारकरी कधीच दर्शन पास किंवा मंदिरातील प्रवेशासाठी प्राधान्य देण्याची मागणी करीत नाही. आषाढीचा सोहळा झाल्यानंतर ‘जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता’ असे मनोमन म्हणत तो माघारी फिरतो.
आषाढीच्या सोहळ्यानंतर पालख्याही माघारी फिरतात व त्यानंतर सुरू होते परतीची वारी. पालख्या पंढरपूरला जाताना गावोगावी होणारे स्वागत, सेवाभाव, उत्साह आदीच्या एकदम उलट हा परतीचा प्रवास असतो. त्यामुळे परतीचा प्रवास कठीण समजला जातो. काही ठरावीक िदडय़ा परतीच्या वारीमध्ये सहभागी होतात. सुमारे वीस दिवसांचा प्रवास करून वारकरी पालख्यांसोबत चालून पंढरीला पोहोचतात. वाटेत विश्रांतीसाठी विविध टप्पे असतात. परतीच्या प्रवासामध्ये वीस दिवसांचा हा पायी प्रवास चक्क नऊ ते दहा दिवसांतच पूर्ण केला जातो. परतीच्या प्रवासातच मुक्कामाची ठिकाणे व भोजन तसेच इतर व्यवस्थांचे नियोजन केलेले असते. पण, पटपट चालत वाट पूर्ण करणे, हा महत्त्वाचा भाग असतो. चालण्याचा एक टप्पा कधीकधी तब्बल ४० किलोमीटरपेक्षाही मोठा असतो. विशेष म्हणजे रात्री दोन-तीन वाजताही प्रवास सुरू केला जातो.
परतीची ही वारी त्यामुळेच कठीण असली, तरी ही वारी करणारे अनेक वारकरी आहेत. पालखी आळंदी किंवा देहूत पोहोचल्यानंतरच त्यांची वारी संपते. याही पलीकडची वारी म्हणजे वारी सुरू होताना काही वारकरी चालत आळंदी किंवा देहूत येतात. पालख्यांसोबत चालत पंढरपूरला जातात. तेथून परतीची वारी करतात व पुन्हा चालतच घरी जातात. त्यांची ही वारी पूर्ण होण्यास कधी-कधी दोन महिनेही लागतात. थक्क करून सोडणाऱ्या या भक्तीची ही ऊर्जा नेमकी येते कुठून, असा प्रश्न निश्चितच पडतो. भागवत धर्माची पतका खांद्यावर घेऊन वारीच्या वाटेवर पिढय़ान्पिढय़ा चालणाऱ्या वारकऱ्याला मात्र त्याचे उत्तर गवसले आहे. त्यामुळेच शेकडो वर्षांपासून या सोहळ्यात चैतन्य नांदते व यापुढेही ते कायम राहील यात तिळमात्र शंका नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhs worship at pandharpur vithoba temple
First published on: 19-07-2013 at 04:42 IST