वाई:लोकांना  नेहमी वेगवेगळ्या गोष्टी सांगून फसवणारे शरद पवार माढ्याचे खासदार असताना त्यांनी मतदारसंघाचा एकही प्रश्न सोडवला नाही. मतदार संघात पाण्याचा एकही थेंब आणला नाही. विकास करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या उमेदवाराच्या तुतारीची पिपाणी रणजीतसिंह नाईक निंबाळकर केल्याशिवाय राहणार नाहीत असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील फलटण येथे सांगितले.मोदी हे एकमेव नेते आहे की ते सर्वांचं भलं करू शकतात ज्या देशाचा नेता सक्षम, कणखर असतो  तो देशच प्रगतीपथावर राहतो असेही फडणवीस म्हणाले,

महायुतीचे माढा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगता प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर, महादेव जानकर, मतदारसंघाचे समन्वयक प्रसाद लाड आदी उपस्थित होते. यावेळी रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले.

फडणवीस म्हणाले, ही लढाई रणजितसिंह नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील अशी नाही तर या पाठीमागचे मोठे गणित माढा मतदारसंघात दडलेले आहे. या मतदारसंघात पूर्वी खासदार राहिलेले शरद पवार यांनी सांगितले होते की माढा मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवितो. त्यावेळी ते देशाचे नेते होते, केंद्रात मंत्री होते. पण त्यांच्या काळात या भागात पाण्याचा एकही थेंब आला नाही. कोणताही विकास झाला नाही. ते करू शकले नाहीत. या भागात येणारे पाणी तुमच्याकडे पोहोचल्यास ते कुठे गेले होते हे तुम्हाला कळले असते म्हणून त्यांनी याकडे बघितले नाही असा बारामतीचा उल्लेख न करता ते बोलले. तुम्ही रणजीतला निवडून दिल्यानंतर तुमचे चोरीला गेलेले पाणी परत आणले आहे. त्याचे काम सुरू झाले आहे.

हेही वाचा >>> सत्तांतराच्या वातावरणामुळे पवार, ठाकरेंवर बोलताना मोदी गोंधळलेत, पृथ्वीराज चव्हाणांची जोरदार टीका

या मतदारसंघात देशाचे किंवा परदेशाचे नेते  येऊ द्यात. पण रणजीतच कोणीही वाकड करू शकणार नाही. विरोधी नेते म्हणतात माळशिरस अकलूज आमच्या पाठीशी आहे. परंतु आता फलटणकरांनीच रणजीतचा विषय अस्मितेचा केला आहे.

रामराजे नाईक निंबाळकर यांनी उचित निर्णय घेतला नाही. काही  विषय अस्मितेचे आणि विकासाचे असतात. त्याच्या विरोधात निर्णय घेतला तर लोक आपल्याला लक्षात ठेवत नाहीत. काही झाले तरी फलटणमध्ये कमळ फुलणार आहे आणि मागील मताधिक्यापेक्षा जास्त मतांनी भाजपचा उमेदवार निवडून येणार आहे. या माढा मतदारसंघासाठी भीमा स्थिरीकरण,वासना वंगना योजना, नीरा देवधर आणि धोम बलकवडीच काम होऊ द्यात या परिसरात एकही गाव दुष्काळी राहणार नाही. फलटण पंढरपूर रेल्वेचे काम ही मार्गी लावल आहे. या भागात विशेष कॉरिडॉर होत असल्यामुळे एमआयडीसी ही मोठ्या प्रमाणात येणार आहे. त्यामुळे येथील तरुणांना कोठेही रोजगारासाठी बाहेर जावे लागणार नाही. हा सर्व भाग आता पाणीदार होईल. रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना पंतप्रधान स्वतः ओळखतात आणि त्यांच्या कामाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. महाराष्ट्रात शिंदे सरकार आल्यानंतर या परिसराला मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर महादेव जानकर आदींची भाषणे झाली.