गायवर्गीय पशूंना ‘लम्पी स्किन डिसीज’ या साथीच्या रोगाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या आजाराची साथ परसली आहे. तसेच, यावरती उपाय रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे रोगाचा संसर्ग होण्याचा वेग कमी आला आहे. त्यात आता महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लम्पी रोगाबाबत अजबच दावा केला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले, “लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले,” असे नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणाला?, शरद पवारांनी दोन वाक्यात विषयच संपवला; म्हणाले…

नामिबियातून आठ चित्ते भारतात

भारतात चित्त्यांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सात दशकांहून अधिक काळ देशातून नामशेष झालेल्या या विशिष्ट प्रजातीचे पुनरागमन झालं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतात आठ चित्ते आणण्यात आले. नामिबियातून आणणेल्या या चित्त्यांना मध्यप्रदेशमधील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आलं आहे.