रत्नागिरी : पर्यटकांचा राबता असलेल्या रत्नागिरीतील आरेवारे आणि भाटय़ेचा समुद्रकिनारा तेलाचा तवंग साचल्यामुळे काळवंडला आहे.

या तवंगामुळे हे किनारे विद्रूप झाले असून पर्यावरणाचाही गंभीर प्रश्न निर्माण  झाला आहे.

आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर एक ते दीड किलोमीटर परिसरात काळे गोळे साचलेले आहेत. असा पहिलाच प्रकार असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. भाटय़े किनारी काही भागांत तेलमिश्रित गोळे आहेत. हा तवंग तसाच साचून राहिला तर किनाऱ्यांवर येणाऱ्या पशु-पक्ष्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. एखादा पक्षी या तवंगावर बसला तर त्याचे गोळे पंखाला चिकटण्याची शक्यता असते, असे सागरी अभ्यासकांकडून सांगण्यात आले. सुट्टय़ांचा मोसम सुरू होत असल्याने या कालावधीत दोन्ही किनाऱ्यांवर पर्यटकांचा राबता सुरू झाला आहे. काळय़ा तेलामुळे किनारे अस्वच्छ झाले आहेत. किनाऱ्यावर फिरायला आलेल्यांना त्रास होत आहे.

जहाजामधून गळती झालेले तेल वाहत किनाऱ्यावर आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक वेळा पावसाळय़ाच्या सुरुवातीला मालवाहू जहाजाच्या देखभाल दुरुस्तीची कामे करताना खराब झालेले तेल समुद्रात टाकले जाते. ते तवंग गोळय़ाच्या रूपाने किनाऱ्यावर येण्याची शक्यता असते. यामुळे सागरी प्रदूषणाला सामोरे जावे लागणार असून प्रशासनाकडून वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काळबादेवीचे पोलीस पाटील आदेश कदम यांनीही या प्रकाराला दुजोरा दिला असून याबाबतची माहिती वरिष्ठांना कळवल्याचे नमूद केले.