नेवासे पोलीस ठाण्यासमोरच वकील रियाज जमशेद पठाण (४९) यांची सोमवारी दुपारी तीन वाजता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने गावठी पिस्तुलातून गोळय़ा घालून हत्या केली. हा विद्यार्थी पोलिसांपुढे नंतर हजर झाला. हत्येचे कारण समजू शकले नाही.
नेवासे तहसील कचेरीच्या आवारात दुय्यम निबंधक कार्यालय असून त्याच्या शेजारीच पोलीस ठाणे आहे. सोमवारी दुपारी वकील रियाज पठाण हे मित्र अल्ताफ पठाण याच्यासह दुय्यम निबंधक कार्यालयात कामासाठी आले होते. कार्यालयाबाहेर ते उभे असताना दुपारी प्रवीण पोपट खरचंद हा तरुण आला. त्याने पाठीमागून पठाण यांच्यावर गावठी पिस्तुलातून तीन गोळय़ा झाडल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर प्रवीण खरचंद हा शेजारी असलेल्या पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर झाला. हत्येसाठी वापरलेले पिस्तूल त्याने पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेनंतर गावात एकच घबराट पसरली. तसेच तणावाचे वातावरण तयार झाले. पठाण यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे.
हत्या करणारा आरोपी प्रवीण खरचंद हा नेवासे फाटा येथील पाटबंधारे खात्याच्या वसाहतीत राहतो. त्याचे वडील निवृत्त शिक्षक आहेत. प्रवीण हा ज्ञानेश्वर महाविद्यालयात शास्त्र शाखेत शिकतो. पठाण यांनी गाडीचा कट मारून माझ्या तोंडात मारली, त्यामुळे मी त्यांची हत्या केली, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. मात्र त्यावर पोलीस विश्वास ठेवायला तयार नाहीत. गुन्हेगारी टोळय़ांमध्ये तीन वर्षांपासून नेवाशात सुडाचे सत्र सुरू आहे. त्याच्याशी आरोपी प्रवीणचा संबंध आहे काय, याचा पोलीस शोध घेत आहेत. पठाण यांची हत्या ही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली. त्यामागे कट असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झालेली नव्हती.
संग्रहित लेख, दिनांक 17th Sep 2013 रोजी प्रकाशित
पोलीस ठाण्यासमोरच वकिलाची गोळय़ा घालून हत्या
नेवासे पोलीस ठाण्यासमोरच वकील रियाज जमशेद पठाण (४९) यांची सोमवारी दुपारी तीन वाजता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने गावठी पिस्तुलातून गोळय़ा घालून हत्या केली.
First published on: 17-09-2013 at 12:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawyer killed by firing in front of thane police