काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या

औरंगाबाद : एक-दीड मिनिटात मतदारसंघनिहाय बूथ समित्या झाल्या आहेत की नाही, याचा आढावा घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या समित्या नसतील तर देवाच्या भरवशावर निवडणुका लढवाव्या लागतील. त्यामुळे बूथ समित्यांचा विषय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्यावा, असा सल्ला त्यांनी गुरुवारी दिला. समित्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाभरातील कार्यकर्ते आणि नेत्यांना आवर्जून बोलावण्यात आले होते.

३० जूनपर्यंत बूथ समित्यांची रचना पूर्ण करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले होते. या समित्यांचा आढावा घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या मेळाव्यात प्रत्येक मतदारसंघासाठी नेमलेल्या समन्वयकांनी त्याची माहिती सांगावी, असे व्यासपीठावरून सांगण्यात आले. मात्र, प्रत्येकाला दोन मिनिटाचाच अवधी देण्यात आला. त्यातही औरंगाबाद पूर्वची माहिती जगताप यांनी दिली,तर औरंगाबाद मध्य आणि पश्चिम याचा आढावा कोणी दिला नाही. पैठणमध्ये बूथ समित्यांचे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे तय्यब सय्यद पटेल यांनी सांगितले. वैजापूरची माहिती पंकज ठोंबरे यांनी दिली. अन्य मतदारसंघातील माहितीही देण्यात आली. त्यातील काही जणांनी आकडे फेकले असल्याचे अशोकराव चव्हाणांच्या लक्षात आले. काहीजणांनी बूथ कमिटय़ा झाल्याचे ‘बंडल’ मारल्याचे त्यांनी भाषणात सांगितले. या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बोलणी सुरू असून सीपीआय, सीपीएम यांच्यासह प्रकाश आंबेडकरांनाही बरोबर घेऊन सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल, असे त्यांनी आवर्जून सांगितले. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांवर आणि कार्यप्रणालीवर त्यांनी या वेळी जोरदार टीका केली. भाजपावर टीका करताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अधिक उल्लेख त्यांच्या भाषणात केला.

बूथ समित्यांच्या रचनेमध्ये कोणी काम केले आहे, कोणी केले नाही हे कळले आहे. पण गावपातळीवर यंत्रणा सज्ज झाली पाहिजे. यंत्रणा नसेल तर देवाच्या भरवशावर निवडणुका लढवाव्या लागतील. ज्यांच्याशी आपले वैचारिक भांडण आहे, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कॅन्सरप्रमाणे गावागावांत पोहोचत आहे. त्यामुळे अधिक सजगपणे काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. येत्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस अधिक आक्रमक होईल असे सांगताना ते म्हणाले, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकरी प्रश्नांवरून सरकारला घेरण्यासाठी कामकाज बंद पाडले जाईल. या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड, माजी आमदार कल्याण काळे, नितीन पाटील, कैलास औताडे आदींची उपस्थिती होती.