‘राजकीय पुढाऱ्यांना आत्मक्लेश करावेच लागतात’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास खाजगीकरणातून करण्याचा विचार नसल्याचे केंद्रीय विमान वाहतूकमंत्री अजितसिंह यांनी स्पष्ट केले.
विमानतळ टर्मिनलबाहेर नव्याने प्रतिष्ठापित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व केंद्रीय विमान वाहतूकमंत्री अजितसिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी कराडमध्ये सुरू केलेल्या आत्मक्लेशाकडे लक्ष वेधले असता राजकीय पुढाऱ्यांना आत्मक्लेश करावा लागतो, असे मुख्यमंत्री उत्तरले. विदर्भाचे मागासलेपण दूर करण्यासाठी मिहानसारखा मोठा प्रकल्प आकार घेत आहे. बोईंग सारखी कंपनी येथे सुरू झाली असून इतरही कंपन्या लवकरच आपल्या कामाला सुरवात करणार आहेत. मिहानसाठी ताब्यात घ्यावयाच्या भूमिसंपादनाचे कामही जवळ जवळ संपत आले असल्याचे चव्हाण म्हणाले.
नागपूर विमानतळाचा खाजगीकरणातून विकास करण्याचा विचार नसल्याचे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री अजितसिंह यांनी स्पष्ट केले. हैद्रराबाद, बंगलोर व इतर काही ठिकाणी खाजगी सहभागातून विमानतळांचा विकास करण्यात आला. मात्र, खाजगी भागिदारीतून नागपूरच्या विमानतळाचा विकास करण्याचा विचार नव्हता आणि नाही. खाजगी गुंतवणूकदार समोर येत असेल तर तसा विचार होऊ शकतो, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्याने येथील शेतकऱ्यांचा माल विदेशात पाठविण्याचीदेखील सोय केली जाणार आहे. त्यामुळे पर्यटनासही नक्कीच वाव मि़ळेल, असे अजितसिंह म्हणाले.