विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात ‘नोटा’ अर्थात, ‘वरीलपकी कुणी नाही’ चा पर्याय राहणार नसून उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा सुध्दा नाही. नुकत्याच झालेल्या १६ व्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच नोटाचा पर्याय होता. उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ७५ लाख रुपये होती, तसेच मतपत्रिकेऐवजी ईव्हीएम अर्थात, इलेक्ट्रानिक्स वोटींग मशिन्स वापरण्यात आल्या होत्या. मात्र, विधान परिषद निवडणुकीत ‘नोटा’ नाही, खर्च मर्यादा नाही, ईव्हीएम नाही, अशी स्थिती आहे.
सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम १० हजार रुपये आहे, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी ५ हजार रुपये आहे. उमेदवारी अर्जावर १० सूचक मतदारांची स्वाक्षरी जरुरी आहे. ही निवडणूक प्रमाणशिर प्रतिनिधित्वाच्या एकल संक्रमण मतदान पध्दतीने होणार असल्यामुळे मतपत्रिकेवर मतदारांना आपल्या उमेदवार पसंतीचे क्रमांक ‘मार्कर पेन’ ने लिहावे लागणार आहेत. पसंतीचा पहिला क्रमांक द्यावाच लागणार आहे. गंमत अशी की, मतदार हे शिक्षक असूनही त्यांनी मतदान कसे करावे ही बाब उमेदवार प्रचारसभा आणि बठकीमधून, तसेच चार पत्रकातून समजावून सांगत आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक मतदार अमरावती जिल्ह्य़ाात (१६ हजार २७५) सर्वात कमी मतदार वाशीम जिल्ह्य़ात (४ हजार २८९) आहेत. यवतमाळ जिल्ह्य़ात ८ ब्हजार ४१६, अकोला जिल्ह्य़ात ८ हजार १४६ आणि बुलढाणा जिल्ह्य़ात ७ हजार ६६२, असे एकूण ४४ हजार ८८८ मतदार आहेत.
अमरावती जिल्ह्य़ात २२ मतदान केंद्रे असून यवतमाळ जिल्ह्य़ात १९, अकोला ११, बुलढाणा १३, वाशीम ६, अशा एकूण ७१ केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. २० जूनला होणाऱ्या निवडणुकीची अधिसूचना मंगळवार, २७ मे रोजी जाहीर झाली असून ३ जूनपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. ४ जूनला छाननी व ६ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. २० जूनला मतदान, तर  २४ जूनला मतमोजणी अमरावती येथे होणार आहे. यवतमाळचे अश्विन मुदगल, अकोल्याचे अरुण िशदे, वाशीमचे रामचंद्र कुळकर्णी, बुलढाण्याचे के. व्ही. कुरंदकर , अमरावतीचे राहुल रंजन हे जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्य़ात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. पाच जिल्ह्य़ात निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून तिचा अंमल २८ जूनपर्यंत राहणार आहे.