रोहा तालुक्यातील चणेराजवळ शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासात अडकून मंगळवारी एका बिबटय़ा मृत्यू झाला. कोकबन जवळ हि घटना घडली आहे. विशेष म्हणजे फणसाड अभयारण येथून अवघ्या ४०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे अभयारण्यातील वन्यप्राण्यांच्या संवर्धनाचा मुद्दा प्रकर्षांने समोर आला आहे. वनविभाग आणि पोलीस सयुंक्तपणे या घटनेचा तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृतावस्थेत आढळलेल्या या बिबट्याचे वजन अंदाजे ६० किलो आहे. पूर्ण वाढ झालेल्या या बिबटय़ाचे उजव्या बाजूचे दोन्ही पायाचे पंजे कापून नेण्यात आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्याची शिकार झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. ५४ चौरस किमी परिसरात असलेल्या फणसाड या अभयारण्यात शेकरू, बिबटे, सर्पगरुड यांसारख्या २४ प्रकारच्या दुर्मीळ वन्यप्रजातींचे वास्तव्य आहे. बिबटय़ाच्या या शिकारीच्या घटनेमुळे अभयारण्यातील वन्यजिवांचे अस्तित्व धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. रानडुकराच्या शिकारीसाठी स्थानिकांच्या मदतीने हा सापळा लावण्यात आला असावा आणि त्यात बिबटय़ा अडकला असावा असा अंदाज वनविभागाकडून व्यक्त केला जातो आहे. या घटनेची रोहा उप वनविभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियमच्या कलम १५ व १६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वनसंरक्षक सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान, मृत बिबट्याचे शरीर शवविच्छेदनासाठी चणेरा येथील वनविभाग कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर दोन डॉक्टरांच्या पथकाकडून त्याचे शवविच्छेदन करण्यात आल आहे. बिबट्याच्या मृत शरीराचे नमुने न्यायवैद्यक तपासणी कलिना आणि हैदराबाद येथे पाठवण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard killed in roha
First published on: 14-10-2015 at 06:28 IST