चंद्रपुरातील २९ शासकीय, खासगी कोविड रुग्णालयात ४२१ खाटा रिक्त

चंद्रपूर : एप्रिल महिन्यात दररोज सरासरी अडीच हजार करोना चाचण्या केल्या जायच्या तिथे मे महिन्यात दररोज दीड हजार करोना चाचण्या होत आहेत. त्याचा परिणाम करोनाबाधितांची संख्या कमी दिसून येत आहे. दरम्यान, रुग्णसंख्या कमी होत असल्याने शहरातील २९ शासकीय व खासगी कोविड रुग्णालयात प्राणवायू, व्हेंटिलेटर व सामान्य अशा ४२१ खाटा रिक्त आहेत.

या जिल्हय़ात मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा तथा एप्रिल महिन्यात करोनाबाधितांची संख्या अतिशय वेगाने वाढली. एप्रिल महिन्यात तर दररोज दीड हजार बाधितांपर्यंत रुग्णांचा आकडा गेला होता. तर मृत्यूची संख्या सरासरी दररोज २५ ते ३० होती. त्यामुळे लोकांमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण होते. जिल्हय़ात एक वेळ अशी होती की लोकांना शासकीय व खासगी रुग्णालयात प्राणवायू, व्हेंटिलेटर खाटा मिळवण्यासाठी धडपड करावी लागत होती. अनेकांचा तर चोवीस तासापेक्षा अधिक कालावधीनंतरही खाट मिळाली नाही म्हणून रुग्णवाहिका, वाहन तथा रुग्णालय परिसरात मृत्यू झाला. अनेकांनी खाट मिळत नाही म्हणून तेलंगणातही धाव घेतली. यातही अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. परंतु आता परिस्थिती हळूहळू निवळताना दिसत आहे. १० मे नंतर रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात होऊ लागली. एप्रिल महिन्यात जिथे दररोज दीड हजार बाधित मिळत होते तिथे आता आकडा पाचशे ते सातशेच्या घरात आला आहे. मात्र वस्तुस्थिती जाणून घेतली असता एप्रिल महिन्यात दररोज सरासरी अडीच हजार करोना चाचण्या होत होत्या. आजच्या घडीला मे महिन्यात दररोज दीड हजार चाचण्या होत आहे. त्यामुळे सुद्धा बाधितांची संख्या कमी दिसत आहे. असे असले तरी मृत्यूची संख्या कमी होताना दिसत आहे. बाधितांची संख्या कमी होत असल्याने शहरातील २९ शासकीय व खासगी कोविड रुग्णालयात प्राणवायू, व्हेंटिलेटर व सामान्य अशा ४२१ खाटा रिक्त आहेत. शहराचा विचार केला तर किमान दोन हजार प्राणवायू तथा सामान्य खाटा आहेत. तर व्हेंटिलेटर खाटा ८४ आहेत. ऑनलाईन पोर्टलवर बघितले असता प्राणवायूच्या २८२ खाटा रिक्त आहेत. त्यापाठोपाठ सामान्य १२२ खाटा रिक्त आहेत, तर व्हेंटिलेटरच्या पाच खाटा रिक्त आहेत. ऑनलाईन पोर्टलचे डॉ. किशोर भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णसंख्या कमी होत असल्याने खाटा रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले.