या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तालुक्यातील पोयनाड येथील मयूरेश गंभीर यास सचिन तावडे खूनप्रकरणी अलिबाग येथील प्रमुख सत्र न्यायालयाने जन्मेठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खून प्रकरणातील आरोपी रणजीत कांतीलाल जैन यांचे सचिन तावडे याच्याबरोबर भांडण झाले होते.  त्यावेळी सचिनने रणजीतला मारहाण केली होती. तेव्हापासून सचिनच्या मनात याचा राग होता. आपल्याला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी रणजीतने मयूरेश गंभीर व गणेश देवरूखकर यांना सुपारी देऊन सचिनला मारण्यास सांगितले.  १३ ऑगस्ट २००७ रोजी सचिन हा नेहमीप्रमाणे सकाळी ११.३० वाजता पोयनाड येथे पतपेढीत कामाला गेला व सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास परत आला. रात्री ९ वाजण्याच्या  सुमारास मयूरेश गंभीर हा सचिन तावडेच्या घरी आला. सचिनचे वडील सुरेश तावडे यांच्याकडे सचिनबद्दल विचारणा केली. त्याचवेळी सचिन घरातून बाहेर आला असता मयूरेश याने आपल्याकडील पिस्तुलाने सचिनच्या अंगावर गोळी झाडली. यात सचिन गंभीर जखमी होऊन मरण पावला . या खटल्याची सुनावणी अलिबाग येथील प्रमुख सत्र न्यायाधीश एम. एम. मोडक यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त  शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. जितेंद्र म्हात्रे यांनी प्रभावीपणे युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान १९ साक्षीदारांचे पुरावे नोंदवण्यात आले. युक्तिवाद करताना सरकारी अभियोक्ता यांनी सुप्रीम कोर्टाचे १५ न्यायनिर्णय दाखल केले.  दरम्यान या प्रकरणातील अन्य दोन आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी सुटका केली. या निर्णयाविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुख्य सरकारी अभियोक्ता प्रसाद पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life imprisonment to mayuresh gambhir for murder case in alibag district
First published on: 27-02-2016 at 03:21 IST