दागिन्याच्या हव्यासापायी पोटच्या दीड वर्षांच्या मुलाचा खून करणा-या महिलेला शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ज्योती शिरीष सासणे (वय २९, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शी नसतानाही परिस्थितिजन्य पुराव्याच्या आधारे गुन्हा सिद्ध होण्याचा हा विरळा प्रकार ठरला आहे.
माता न तू वैरिणी या उक्तीचा प्रत्यय आणून देणारी घटना करवीरनगरीत दोन वर्षांपूर्वी घडली होती. ज्योती सासणे या महिलेला दीड वर्षांचा आर्यन नावाचा मुलगा होता. त्याच्या अंगावर सोन्या-चांदीचे अनेक दागिने होते. या दागिन्याचा हव्यास ज्योतीला पडला होता. त्यातून तिला दुर्बुद्धी सुचली १८ ऑगस्ट २०१३ रोजी ज्योतीने घरी कोणी नसल्याचे पाहून दीड वर्षांच्या पोटच्या गोळ्याचा गळा दाबून खून केला. त्याला खांद्यावर टाकून तिने पुईखडी भाग गाठला. तेथे त्याला टाकून देऊन ती घरी परतली. घरी आल्यावर ज्योतीने मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव करून टाहो फोडण्यास सुरुवात केली. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाता. पोलीस तपासात आर्यनचा खुनी अन्य कोणी नसून ज्योती हीच असल्याचे दिसून आल्यावर तिच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
याबाबत न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरू राहिले. आर्यनला सोबत घेऊन घराबाहेर पडणारी आणि आर्यनशिवाय गडबडीने घरी परतणारी ज्योती हिला पाहणारे असे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. शुक्रवारी सत्र न्यायाधीश पी.एन.कंबायते यांनी ज्योती सासणे हिला जन्मठेप व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी काम पाहिले.