डॉ. विठ्ठलराव विखे साहित्य पुरस्कार जाहीर; दि. १४ रोजी वितरण
सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या जयंतीनिमित्त प्रदान केले जाणारे यंदाचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक व विचारवंत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना साहित्य जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार किरण गुरव (कोल्हापूर) यांच्या जुगाड कादंबरीला, विशेष साहित्य पुरस्कार प्रा. गो. तु. पाटील (येवला, नाशिक) यांच्या ‘ओल अंतरीची’ या आत्मचरित्राला, नाटय़सेवा पुरस्कार राजकुमार तांगडे यांना, कलागौरव पुरस्कार धनंजय गोवर्धने (नाशिक) व समाजप्रबोधन पुरस्कार शमसुद्दिन तांबोळी (पुणे) यांना जाहीर करण्यात आले आहेत. याशिवाय जिल्हा साहित्य पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत.
पुरस्काराचे यंदाचे २९ वे वर्ष आहे. पुरस्कार वितरण डॉ. विट्ठलराव विखे यांच्या जयंतीदिनी (दि. १४) सकाळी १०.३० वा. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत लोणी येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात होणार आहे. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे व निमंत्रक डॉ. राजेंद्र सलालकर यांनी ही माहिती दिली. जीवनगौरव पुरस्कार १ लाख रुपये व स्मृतिचिन्ह, उत्कृष्ट साहित्य पुरस्कार ५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह, विशेष साहित्य पुरस्कार, नाटय़सेवा पुरस्कार, समाजप्रबोधन पुरस्कार व कलागौरव पुरस्कार प्रत्येकी २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह अशा स्वरुपाचे आहे.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार नीलिमा क्षत्रिय (संगमनेर) यांच्या ‘आलापल्लीचे दिवस’ या ललित ग्रंथाला (१० हजार रु. व स्मृतिचिन्ह), जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार शैलेश त्रिभुवन (कोपरगाव) यांच्या ‘अस्वस्थ मनातील शब्द’ या काव्यसंग्रहाला (१० हजार रु. व स्मृतिचिन्ह) यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये डॉ. कसबे व सलालकर यांच्यासह एकनाथ पगार, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांचा समावेश होता.