विश्वास पवार, लोकसत्ता

वाई : पावसाचे बिघडलेले वेळापत्रक, उन्हाचा अभाव आणि गेले काही वर्षे पठाराला घातलेल्या सुरक्षा भिंतीमुळे फुलांचे बिघडलेले नैसर्गिक चक्र या साऱ्यांमुळे गेली काही वर्षे कासच्या पठारावर रुसलेली फुले यंदाही उमलण्याचे नाव घेत नाहीत. ऑगस्ट महिन्यात तरी ही फुले बहरण्याची शक्यता कमी असून, ती सप्टेंबरपासून काही प्रमाणात दिसू लागतील असा अंदाज आहे.

फुले नसल्याने निराश झालेल्या पर्यटकांना सहलीचा खर्च आणि वाढीव प्रवेश शुल्काचाही मनस्ताप यंदा सोसावा लागत आहे.

पावसाळा सुरू झाला, की जुलैपासून कास पठार फुलांनी बहरू लागते. मात्र गेले काही वर्षे पर्यटकांचा वाढता वावर आणि या पठाराला गेली अनेक वर्षे घातलेले कुंपण यामुळे या फुलांचा बहर कमी झाला आहे.  कुंपणाबाबत टीका झाल्यावर ते काढण्यात आले असले, तरी दरम्यानच्या काळात पठाराच्या नैसर्गिक स्थितीत मात्र खूप बदल घडलेले आहेत. येथील चराई बंद झाल्याने पठारावर मोठय़ा प्रमाणात तण माजले आहे. यामुळे गेली अनेक वर्षे फुलांचे प्रमाण हे कमी होत चालले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पठारावर फुलांचा हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. मात्र येथे पर्यटन सुलभ होण्यासाठी विविध सुविधा पुरविण्याबाबत तयारी सुरू आहे. एक सप्टेंबरनंतर पठारावर फुलांचा बहर येईल, अशी आशा आहे. – दत्ता किर्दत,अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती