वाडा तालुक्यातील तरुणांकडून हिरव्या गवताची विक्री

वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या उज्जेनी, ओगदा, नांदणी परिसरातील आदिवासी मजुरांना हिरव्या गवत विक्रीतून आश्वासक रोजगार मिळत आहे.  या भागातील माळरानावर हिरव्या गवताला मुंबई  आणि आजुबाजूच्या उपनगरातील तबेल्यातून मोठी मागणी असते. या मागणीचा लाभ येथील  गवताचा व्यवसाय करणारे व्यापारी घेत असतात.

वाडा तालुक्यातील अनेक तरुण या व्यवसायात उतरले आहेत. गवताची वाहतूक करण्यासाठी ट्रक भाडय़ाने घेतले आहेत. ग्रामीण भागांत भात लावणीची कामे संपल्यानंतर येथील मजुरांना काम नसल्याने त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढावते. मात्र ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत ग्रामीण भागातील माळरानावर उगविणाऱ्या हिरव्या गवताला शहरी भागातील गुरांच्या तबेला मालकांकडून मोठी मागणी असते.

वाडय़ातील काही तरुण ग्रामीण भागातील माळरानावरील गवत  जमीन मालकांकडून विकत घेतात. नंतर हेच गवत येथील स्थानिक मजुरांकडून कापून त्याचे भारे बांधले जातात.  या भाऱ्यांचे वजन करून मजुरांना मोबदला दिला जातो. गवत विक्रीमुळे   बेरोजगार तरुणांना आणि स्थानिक आदिवासींना रोजगार लाभला आहे. त्यामुळे मंदीच्या काळात गवताच्या काडीचा आधार मिळाला आहे.

भाद्रपद महिन्यात ग्रामीण भागात रोजगारात मंदीचे वातावरण असते. गणेशोत्सवानंतर दसरा— दिवाळी  सणांच्या काळात आर्थिक चणचण दूर करण्यासाठी गवतविक्रीचा पर्याय स्वीकारला जातो. या दिवसांत सर्व संकटांवर मात करुन चांगले दिवस दाखवणारा गवताचा व्यवसाय मजुरांना मोठा आधार आहे. तालुक्यातील डोंगर आमि माळरानावर उगवणाऱ्या गवताचे भारे बांधून विकण्याचा व्यवसाय सध्या तालुक्यात जोरदार चालू झाला आहे.